"माझा मेळावा डोंगरात, ना खुर्च्या ना जेवण, लोकं घरातून भाकरी बांधून आणणात"
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2022 01:04 PM2022-10-05T13:04:09+5:302022-10-05T13:04:46+5:30
दरवर्षी दोन दसरा मेळावे असायचे, जो मी एक दुपारी घेत, तर दुसरा मुंबईत होत
मुंबई - दसरा मेळाव्यावरून एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे आमने-सामने आल्याचे पाहायला मिळत आहे. दोन्ही गटांकडून मोठ्या प्रमाणावर शक्तिप्रदर्शन करण्यासाठी चढाओढ सुरू असल्याचे दिसून येत आहे. राज्यभरातून शिवसैनिक मुंबईत दाखल होत आहेत. तर, बीड जिल्ह्यातील सावरगाव येथे पंकजा मुंडेंचादसरा मेळावा होत आहे. येथील भगवान भक्ती गडावर खासदार प्रीतम मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी मेळाव्याचं आयोजन केलं आहे. त्यासाठी, बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातील हजारो कार्यकर्ते जमले आहेत. त्यामुळे, यंदा एकूण तीन दसरा मेळावे होत आहेत
दरवर्षी दोन दसरा मेळावे असायचे, जो मी एक दुपारी घेत, तर दुसरा मुंबईत होत. यावर्षी आणखी एक मेळावा होत आहे, एकनाथ शिंदेंचा. मी सर्वांना शुभेच्छा देते, तसेच या सर्व मेळाव्यातून जनतेचे आणि वंचितांचे, पीडितांचे विषय प्राधान्याने घेतली जातील हीच अपेक्षा. माझा मेळावा हा गरिबांचा, वंचिताचा असून गावकडचा साधारण मेळावा आहे. इथे ना खुर्च्या लागल्या आहेत, ना खाण्या-पिण्याची व्यवस्था आहे. लोकं आपल्या घरातूनच भाकरी बांधून आणतात. माझ्यासाठी ही वेगळीच ताकद आहे, मला मोठा आशीर्वाद आहे, असे पंकजा यांनी म्हटले. पंकजा यांनी आपल्या मेळाव्यातील सर्वसामान्य लोकांची भावना व्यक्त करताना मुंबईच्या मेळाव्यातील शानशौकतीवर एकप्रकारे निशाणाही साधला.
आमचा मेळावा डोंगरात होतो, डोक्यावर ऊन असतं, तरीही लोकांचा उत्साह असतो, असा माझा मेळावा असतो. माझा मेळावा हा पक्षाचा नसून वंचितांचा आहे. मी दसरा मेळाव्याची सर्वांचीच भाषणं ऐकायला उत्सुक आहे, मी दोन्ही शिवसेना नेत्यांची भाषण ऐकणार आहे. त्यानंतर, माझंही भाषण टीव्हीवर ऐकणार आहे, असे पंकजा यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले.
दरम्यान, मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर आणि बीकेसीतील मैदानावर शिवसेनेचा दसरा मेळावा होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक दाखल झाले आहेत. त्यासाठी, बीकेसी मैदानावर येणाऱ्या शिवसैनिकांना फूड पॅकेट्स देऊन जेवणाची सोय करण्यात आली आहे.