मुंबई : आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबई काँग्रेसने शंभर दिवसांच्या संपर्क अभियानाची घोषणा केली आहे. ‘माझी मुंबई, माझी काँग्रेस’ या उपक्रमांतर्गत १६ जानेवारीपासून मुंबईतील सहा जिल्ह्यांमध्ये कार्यकर्ता मेळावे, तर २६ जानेवारीपासून शंभर वाॅर्डांमध्ये पदयात्रांचे आयोजन करण्यात आले आहे. एकाचवेळी काँग्रेस कार्यकर्ते आणि तळागाळातील नागरिकांशी या उपक्रमातून संवाद साधला जाणार असल्याचे नवनियुक्त अध्यक्ष, आमदार भाई जगताप यांनी सांगितले.
आझाद मैदान येथील पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत अध्यक्ष भाई जगताप म्हणाले की, १६ जानेवारीपासून ‘माझी मुंबई, माझी काँग्रेस’ अभियानाला सुरुवात होईल. याअंतर्गत १६ जानेवारीला उत्तर मुंबई, २३ उत्तर मध्य मुंबई, २४ ईशान्य मुंबई, २८ दक्षिण मध्य मुंबई आणि ३१ जानेवारीला दक्षिण मुंबई, तसेच उत्तर पश्चिम मुंबई जिल्ह्यांमध्ये कार्यकर्ता मेळावा होईल, तर २६ जानेवारीपासून मुंबईच्या १०० वॉर्डांमध्ये पदयात्रा निघतील. काँग्रेस नगरसेवकांच्या वाॅर्ड आणि आजूबाजूच्या वाॅर्डांतून पदयात्रेद्वारे प्रभागातील विविध समस्या, त्याबाबत काँग्रेसची भूमिका व धोरणे जनतेपर्यंत पोहोचवली जातील. पालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांच्या सायन कोळीवाडा विभागातून पदयात्रेला सुरुवात केली जाईल. या विभागात काँग्रेसचे तीन नगरसेवक आहेत. सभेने पदयात्रेची सांगता होईल, असे जगताप यांनी सांगितले. यावेळी कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा, सरचिटणीस भूषण पाटील, संदेश कोंडविलकर उपस्थित होते.
यावेळी भाई जगताप यांनी मुंबईतील ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करातून संपूर्ण सूट मिळावी, ५०१ ते ७०० चौ.फू. घरांना ६० टक्के सूट देण्याची मागणी केली, तसेच मुंबईत ६८ टक्के नागरिक झोपडपट्टी व चाळीमध्ये राहतात. त्यांना महापालिकेकडून मोफत पाणी मिळालेच पाहिजे, अशी काँग्रेसची मागणी असल्याचे जगताप यांनी सांगितले. महाविकास आघाडी सरकारने १५ जानेवारीपर्यंत डीम्ड कन्व्हेयन्स देण्याचा निर्णय घेतला असून, त्याची मुदत ३१ मार्चपर्यंत वाढविण्याची मागणी केली.