Join us

कोरोनामध्ये माझं नाव जरुर झालं; पण त्याचं खरं श्रेय अंगणवाडी सेविकांना- उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2024 7:01 PM

तुमचे हात सरकारच्या कानाखाली आपटल्यावर केवढा आवाज होईल?, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी सरकारवर हल्लाबोल केला. 

मुंबई: गेला महिनाभर राज्यात सुरू असलेला अंगणवाडी सेविकांच्या संपाचा आक्रोश आज मुंबईतील आझाद मैदानावर दिसला. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला. 

आज, नेता म्हणून नाही भाऊ म्हणून आलोय. आज क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे. क्रांतिज्योती, महात्मा लावावं अशी माणसंच आता उरली नाहीत. तुम्ही सावित्रीच्या लेकी आहेत. अंगणवाडी, आशा सेविका, कर्मचारी गावागावात दोन जाऊन काम करतात. हेच काम करणारे तुमचे हात सरकारच्या कानाखाली आपटल्यावर केवढा आवाज होईल?, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी सरकारवर हल्लाबोल केला. 

सरकारमध्ये जरा संवेदना असतील, तर ते तुमच्या मागण्या मान्य करतील, नाहीतर आमचं सरकार आल्यावर तुमच्या मागण्या आम्ही पूर्ण करणार असल्याचं आश्वासन उद्धव ठाकरेंनी अंगणवाडी सेविकांना दिलं. तसेच कोरोनामध्ये माझं नाव जरुर झालं. पण त्याचं खरं श्रेय अंगणवाडी सेविकांना आहे. कारण त्या काळात तुम्ही घरोघरी जाऊन लोकांनी काळजी घेत होतात, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. 

दरम्यान, आमचं सरकार पडलं नसतं, तर तुम्हाला इथे आंदोलनासाठी यावं लागलं नसतं. भारताला खऱ्या अर्थाने सुदृढ अंगणवाडी सेविका करतात. यांच्याकडे सरकार आणण्यासाठी खोके आहेत. पण आशाताई-अंगणवाडी सेविकांना द्यायला यांच्याकडे पैसे नाहीत. हे सरकार तुमचं आहे का? मला नवीन वर्षाच्या शुभेच्छा नकोत, मला निश्चय पाहिजे की, माझं सरकार मी निवडणार, असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

टॅग्स :उद्धव ठाकरेमहाराष्ट्र सरकारमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस