CoronaVirus News in Mumbai: मायबाप सरकारने आमच्याकडेही थोडे लक्ष द्यावे, ट्विटरद्वारे मुख्यमंत्र्यांना साकडे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2020 12:55 AM2020-05-02T00:55:42+5:302020-05-02T06:42:32+5:30
ईमेल-ट्विटरद्वारे थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांना साकडे घालण्यात येत आहे.
मुंबई : धारावी, वरळीसह मुंबईतील अनेक भागात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन जोरदार कार्यवाही करीत आहे. तशीच दखल हॉटस्पॉट बनू पाहणाऱ्या गोवंडीचीही घ्यावी, इथेही आवश्यक तपासण्या कराव्यात, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे. त्यासाठी ईमेल-ट्विटरद्वारे थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांना साकडे घालण्यात येत आहे.
मुंबईतील गोवंडीमधील पंचशील चाळ, लुम्बिनी बाग येथे एकाचा कोरोनाने मृत्यू झाला. चार दिवस उलटूनही मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांची, नातेवाइकांची, संपर्कात आलेल्या व्यक्तींची तपासणी केली गेली नाही. येथील स्थानिक सामाजिक सेवा संस्था राहुल सेवा मंडळातर्फे काल मुख्यमंत्र्यांना ईमेल व ट्विटरद्वारे निवेदन दिले गेले. त्यात वस्तीतील सर्वच संबंधित लोकांची तात्काळ कोरोना टेस्ट व क्वारंटाइन करण्याची मागणी करण्यात आली. सरकारतर्फे तर टेस्ट न झाल्याने पंचशील चाळीतील सहा जणांनी दुसरीकडून टेस्ट करून घेतली होती. त्यात चार जण पॉझिटिव्ह आढळून आले. याची माहिती मिळताच गुरुवारी सकाळी पंचशील चाळीत सरकारी कर्मचारी आले आणि सहा जणांना क्वारंटाइन शिक्का मारून गेल्याचे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे.
मात्र, प्रशासनाने तपासण्या कराव्यात, अशी स्थानिकांची मागणी आहे. पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने संपूर्ण चाळीतील रहिवाशांची चाचणी व्हावी, अशी मागणी होत आहे. एकट्या गोवंडीत साठ रुग्ण असल्याची चर्चा आहे. सील केलेल्या पंचशील चाळीतील रहिवाशांना अजूनही सार्वजनिक शौचालय वापरावे लागत आहे. या भागात कोरोनाचा संसर्ग आणखी टाळण्यासाठी सरकार केव्हा तातडीने योग्य पावले उचलणार, असा रहिवाशांचा प्रश्न आहे. इतरांना बाधा होण्याआधी तातडीने येथून दुसरीकडे सुरक्षित ठिकाणी हलवले जावे. लुम्बिनी बाग, गोवंडी जनतेचे गाºहाणे ऐकावे, अशी मागणी होत आहे.
।खासगी चाचणी पॉझिटिव्ह
वस्तीतील सर्वच संबंधित लोकांची तत्काळ कोरोना टेस्ट व क्वारंटाइन करण्याची मागणी करण्यात आली. सरकारतर्फे टेस्ट न झाल्याने पंचशील चाळीतील सहा जणांनी दुसरीकडून टेस्ट करून घेतली होती. त्यात चार जण पॉझिटिव्ह आढळून आले.