मुंबई - केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी मीटू मोहिमेबाबत आपले मत व्यक्त केलं आहे. मीटू चळवळीमुळे ज्यांची नावे समोर आली आहेत त्यापैकी जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल. नाना पाटेकर दोषी असतील तर त्यांच्यावरही कारवाई केली जाईल. मात्र, या चळवळीचा कोणी गैरफायदा घेऊ नये. कोणी गैरफायदा घेतल्यास पोलिसांनी त्यांच्यावरही कारवाई करावी. माझ्याबाबत बोलायचे झाल्यास माझा संबंध मीटू शी नाही तर, युटू शी असल्याची नेहमीप्रमाणे यमक जुळवून खिल्लीही त्यांनी उडवली.
रामदास आठवले आज पुण्यात आले होते, त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी राजकारणासह विविध विषयांसंदर्भात चर्चा केली. दलित, बहुजन ही काँग्रेसची मते बहुजन वंचित आघाडीमुळे काँग्रेसला मिळणार नाहीत, त्यामुळे त्याचा फायदा हा भाजपालाच होणार आहे. तर 2019 ला भाजापचंच सरकार सत्तेत येईल, असे भाकित आठवलेंनी केलं. तसेच मीटू मोहिमेबाबत विचारले असता, माझा संबंध मीटू शी नसून यु टूशी आहे, असे म्हणत आपल्यातला कवी जागवला. मात्र, या मोहिमेचा कुणीही गैरफायदा घेऊ नये. जर, कोणी गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला, तर पोलिसांनी त्यांच्यावरही कारवाई करावी असे सांगताना नाना दोषी असल्यास नानावरही कारवाई होईल, असेही आठवलेंनी स्पष्ट केलं आहे.