मुंबई: मुंबईलगतच्या समुद्रात एका मोठ्या जहाजावर (क्रूझ) सुरू असलेल्या हाय प्रोफाइल ड्रग्ज पार्टीवर अमलीपदार्थ नियंत्रण कक्षाने (एनसीबी) शनिवारी रात्री छापा मारला. एनसीबीने १० हून अधिक जणांना ताब्यात घेतले असून, त्यामध्ये सुरुवातील एका बड्या अभिनेत्याच्या मुलाचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत होते. याचदरम्यान आता या प्रकरणी बॉलिवूडचा अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानची एनसीबीकडून चौकशी करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे.
सरद प्रकरणात आर्यन खान याचीही चौकशी केली जात आहे. ड्रग्ज पार्टीशी आर्यन खान याचा काय संबंध होता याबाबत त्याची चौकशी करण्यात आली आहे. पण अद्याप त्याच्याविरोधात कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही व अटक केलेली नाही. प्रकरणाची चौकशी सुरू आहे, अशी माहिती एनसीबीचे झोनल अधिकारी समीर वानखेडे यांनी सांगितलं. याशिवाय ड्रग्ज पार्टीच्या ६ आयोजकांना समन्स धाडण्यात आले आहेत.
एनसीबीच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आर्यन खान याचा मोबाइल फोन जप्त करण्यात आला असून त्यातून माहिती गोळा केली जात आहे. आर्यन खानच्या व्हॉट्सअॅप चॅटची आणि मेसेजेसची चौकशी केली जात आहे. या क्रूझ पार्टीसाठी दिल्लीहून मुंबईत आलेल्या तीन तरुणींनाही एनसीबीनं ताब्यात घेतलं असून त्यांचीही चौकशी केली जात आहे. या तीनही बड्या उद्योजकांच्या मुली असल्याचं सांगितलं जात आहे.
आर्यन खानचं ड्रग्ज प्रकरणात नाव पुढे आल्यानंतर शाहरुख खानने केलेल्या एका वक्तव्याची चर्चा पुन्हा एकदा सोशल मीडियावर रंगू लागली आहे. माझ्या मुलाने ती सगळी वाईट काम करावीत जी मी माझ्या तरुणपणी करु शकलो नाही, असं शाहरुख खान याने एका जून्या मुलाखतीत म्हटलं होतं.
शाहरुख खानने नेमकं काय म्हटलं होतं?
शाहरुखने १९९७ साली सिमी ग्रेवालच्या टॉक शोमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी आर्यनचा जन्म झाला होता आणि शाहरुखने पत्नी गौरी खानसोबत सिमी ग्रेवालच्या टॉक शोमध्ये हजेरी लावली होती. दरम्यान शाहरुखला आर्यन विषयी काही प्रश्न विचारण्यात आले होते.
आर्यन मोठा झाला की त्याने मुलींना डेट करावे, ड्रग्स आणि सेक्स या गोष्टींचा देखील अनुभव घ्यावा. ज्या गोष्टी मी माझ्या तरुणपणी करु शकलो नाही त्या सर्व गोष्टींचा अनुभव त्याने घ्यावा. आर्यनने एक बॅड बॉय बनायला हवे आणि जर तो गूड बॉयसारखा वागू लगाल तर मी त्याला घरा बाहेर काढेन, असे शाहरुख हसहत म्हणाला होता. पुढे तो विनोद करत म्हणाला, माझी एक इच्छा आहे आर्यने अनेक मुलींना त्रास द्वावा. त्या मुलींचे पालक माझ्याकडे तक्रार घेऊन आले पाहिजे, असं वक्तव्य शाहरुख खानने केलं होतं.