मुंबई - राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात अखेर भाजपाच्या ९ आणि शिंदे गटाच्या ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर, मंत्रीमंडळातील दोन मंत्र्यांच्या शपथविधीवरुन विरोधक आणि आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनीही राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारावर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच, मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नसल्यानेही विरोधक, व महिला नेत्यांकडून टीका करण्यात येत आहे. यासंदर्भात स्वत: अब्दुल सत्तार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या एक दिवस अगोदर माझी बदनामी करुन अडकविण्याचं हे षड्यंत्र होतं, असे सत्तार यांनी म्हटलं.
मला दिलेल्या जबाबदारीचा फायदा मी सामान्य माणसांपर्यंत पोहोचवेल. मला जाणून बुजून अडकविण्याचा प्रयत्न झाला. कारण, एक दिवस अगोदरच हे प्रकरण समोर येतं म्हणजे काय. माझा मुलगा एलएलबी करतोय, त्याचंही नाव टीईटीच्या घोटाळा यादीत येतं, याला काय म्हणावं. माझ्या मुली 2008 मध्ये नोकरीला लागल्या आहेत. त्यावेळी, टीईटीही नव्हती. आता, त्यांचे लग्न झालेले आहेत, त्यांना मुलं-बाळं आहेत. त्यामुळे, कुणीही असं कोणालाही बदमान करण्याचं काम करू नये. सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे, ज्यांच्या पगारी सुरू आहेत, त्या बंद करू नये, असेही अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केले.
2 नेत्यांना अंजली दमानियांचा आक्षेप
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात आरोप झालेले आणि त्यामुळेच ठाकरे सरकारमधून मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलेले संजय राठोड यांचा नव्या सरकारमध्ये समावेश झाल्यामुळे दमानिया यांनी आक्षेप घेतला आहे. तसेच अब्दुल सत्तार यांच्या मुलींची प्रमाणपत्र टीईटी घोटाळा प्रकरणात रद्द झाल्यामुळे त्यांच्याही नावावरूनही दमानिया यांनी हल्लाबोल केला आहे. अंजली दमानिया यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. तसेच एका माळेचे मणी म्हणत टीका केली आहे.
काय आहे टीईटी घोटाळा
सन २०२० ते २०२१ या दोन वर्षात झालेला शिक्षक भरती घोटाळा (टीईटी), सार्वजनिक आरोग्य विभागातील वर्ग-ड श्रेणीतील कर्मचाऱ्यांची भरती तसेच म्हाडामधील कर्मचाऱ्यांच्या भरती प्रकरणी आता ईडीने मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करत चौकशी सुरू केली आहे. ईडीने ईसीआयआर नोंदवत यातील काही तक्रारदारांचा जबाब नोंदविण्याचे काम सोमवारी सुरू केले आहे. कमी गुण मिळालेल्या तब्बल ७८८० उमेदवारांचे गुण वाढवून त्यांना शिक्षक म्हणून भरती केल्याचा घोटाळा २०२० मध्ये उजेडात आला.
अब्दुल सत्तारांच्या मुलांचाही समावेश?
गैरप्रकार केलेल्या विद्यार्थ्यांच्या यादीत शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या तीन मुली आणि एक मुलगा यांचेही नाव आहे. यातील दोन मुलींची प्रमाणपत्रे रद्द केली आहेत. परंतु, सत्तार यांनी याचे खंडन केले असून हे बदनामीचे षडयंत्र असल्याचे ते म्हणाले. सत्तार यांच्या मुलांची नावे या यादीत आली कशी याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी केली आहे. तर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही याप्रकरणाची पारदर्शकपणे चौकशी करण्याची मागणी केली आहे.