सागर नेवरेकर
मुंबई : सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झालेल्या मैत्रिणीला भेटायला मुंबईतून पाकिस्तानात गेलेल्या हमीद निहाल अन्सारी याची अखेर सहा वर्षांनंतर पाकिस्तानच्या तुरुंगातून सुटका झाली. गुरुवारी सकाळी १०च्या सुमारास हमीद अन्सारी दिल्लीवरून मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचला. तिथून थेट वर्सोवा येथील राहत्या घरी रवाना झाला.
हमीद अन्सारी याने सांगितले की, सर्व भारतीय माझे बांधव आहेत, हे लहान असताना शाळेमध्ये शिकविले जाते. आपल्या मायदेशी परतण्यात किती आनंद असतो, हे तीच व्यक्ती सांगू शकते जी दुसऱ्या देशात राहून आली आहे. माझ्या स्वागताची घरी जोरदार तयारी करण्यात आली आहे. त्यामुळे लवकरात लवकर घरी जाण्यास उत्सुक आहे. सोशल मीडियावर कधीच प्रेम करू नका. आई-वडिलांपासून काही लपवून ठेवू नका. बाहेरच्या देशात जाण्याची रीतसर परवानगी असेल; तरच तुम्ही जा, असा सल्ला हमीदने दिला आहे.‘मेरा बेटा वापस आ गया’
पाकिस्तानाच्या बॉर्डरवरून जेव्हा तो सर्व कागदी प्रक्रिया करून आला त्या वेळी तो धावतच आईजवळ गेला आणि तिला मिठी मारली. तेव्हा रडतच ‘मेरा बेटा वापस आ गया,’ असे म्हणत आईनेही त्याला मिठी मारली. काही क्षण दोघेही बोलण्याच्या मन:स्थितीत नव्हते. त्यानंतर सर्वांनी भारतभूमीचे चुंबन घेतले. ‘‘मी मायदेशी परत आलो याचा मला खूप आनंद झाला आहे. पुढील आयुष्यात मला माझ्या आई-वडिलांची सेवा करायची आहे,’’ असे उद्गार हमीदने भारताच्या सीमेवर काढले, अशी माहिती ज्येष्ठ पत्रकार जतीन देसाई यांनी ‘लोकमत’ला दिली.खूप प्रयत्न केलेहमीद घरी आल्याने घरात आनंदोत्सव साजरा केला जात आहे. २०१२ साली हमीद पाकिस्तानात गेला, तेव्हापासून त्याला भारतात आणण्यासाठी घरच्यांनी खूप प्रयत्न केले. त्याच्या सोशल मीडियाच्या साईटची चौकशी केली. हमीदने पदवीचे शिक्षण घेतल्यावर तो चांगल्या नोकरीला लागला होता.- फरान अन्सारी,हमीद अन्सारीचा चुलत भाऊ
त्यानंतर दिला संवाद साधण्यास नकारहमीद मुंबईचा असून वर्सोवा येथील राहत्या घरी परतला. घरी परतल्यावर प्रसारमाध्यमांनी त्याच्याशी संवाद साधताना तुरळक धक्काबुक्की झाली. त्याचा त्रास हमीदला झाला. त्यामुळे कुटुंबीयांनी घराचा दरवाजा लावून घेतला. त्यानंतर प्रसारमाध्यमे ताटकळत घराबाहेर बसून होती.