Aarey Colony murder case: 'पार्टीत माझ्या मुलाचं रॅगिंग करून त्याच्यावर लैंगिक अत्याचार झाले'
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2018 01:28 PM2018-05-18T13:28:56+5:302018-05-18T13:29:16+5:30
अर्थवच्या वडिलांनी बुधवारी मुंबई पोलीस आयुक्तांना सहा पानांचं पत्र पाठवलं.
मुंबई- गोरेगावातील आरे कॉलनीत मृतावस्थेत आढळलेल्या अथर्व नरेंद्र शिंदे या 21 वर्षांच्या तरुणाच्या मृत्यूमागील नेमक्या कारणाचा उलगडा अद्याप झालेला नाही. या प्रकरणाचा तपास गुरुवारी गुन्हे शाखेच्या युनिट 11कडे सोपावण्यात आला. अथर्व शिंदेच्या आई-वडिलांनी पोलीस तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर प्रकरणाचा तपास वर्ग करण्यात आला. दरम्यान, अर्थवच्या वडिलांनी बुधवारी मुंबई पोलीस आयुक्तांना सहा पानांचं पत्र पाठवलं. या पत्रात अर्थवच्या वडिलांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. 'माझ्या मुलाचं रॅगिंग करण्यात आलं, त्याला त्रास देऊन त्याच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले', असा आरोप अर्थवच्या वडिलांनी केला आहे. त्या दिवशी पार्टीला उपस्थित असणाऱ्या सर्व 30 तरुणांना हत्येचा आरोप ठेवून अटक करावी व त्यांची लाय डिटेक्टर टेस्ट करावी, अशी मागणीही त्यांनी पत्रातून केली आहे.
8 मे रोजी अथर्व आरे कॉलनीतील एका व्हिलामध्ये मित्रांबरोबर पार्टीला गेला होता. मराठी सिनेसृष्टीतील एका मोठ्या निर्मात्याच्या मुलीच्या वाढदिवसाची ती पार्टी होती. त्या पार्टी स्थळापासून अर्धा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या एका तळ्याजवळ अथर्वचा मृतदेह सापडला. 9 मे रोजी अथर्वचा मृतदेह सापडला पण त्याची हत्या आधल्या दिवशी झाल्याचा अहवाल फॉरेन्सिक विभागाने दिला. अथर्वच्या शरीरावर तसंच खासगी भागावर जखमा आढळून आल्या.
'अथर्वच्या हत्येला नऊ दिवस झाले, पण तरिही अजून काही ठोस समोर आलं नाही. आरेतील बंगला नंबर 212मध्ये सर्वकाही घडलं. जे तरुण पार्टीला उपस्थित होते ते सर्व संशयित आहेत. त्या सर्व 30 जणांची नाव मी पत्रात लिहिली असल्याचं अथर्वच्या वडिलांनी टाइम्स ऑफ इंडियाला सांगितलं आहे. वाढदिवसाच्या पार्टीमध्ये आलेल्या तरुणांपैकी फक्त वाढदिवस असलेल्या मुलीलाच अथर्व ओळखत होता. अथर्वची मैत्रिण अथर्वच्या हत्येनंतर स्वतः हॉस्पिटलमध्ये अॅडमीट आहे. तिच याबद्दलची योग्य माहिती देऊ शकते, असंही ते म्हणाले. अथर्व त्याचा जीव वाचविण्यासाठी पळत असताना ती मुलगी व इतर दोन मुलं त्याचा पाठलाग करत असल्याचं सीसीटीव्हीमध्ये स्पष्ट दिसत आहे, असंही अथर्वच्या वडिलांनी म्हटलं आहे.
पार्टी नंतर अथर्व घरी न आल्याने अथर्वच्या वडिलांनी स्वतः त्याला शोधायला सुरूवात केली. 'अथर्वच्या शरीरावर ज्या जखमा आहेत त्या स्वतः तयार केलेल्या नाहीत. आरे पोलिसांकडून योग्य तपास झालेला नाही. आरोपींना पकडण्याऐवजी ते त्यांना वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत, असं ही अथर्वच्या वडिलांनी पत्रात म्हटलं आहे.