Join us  

'माझा हा अत्यंत आवडता रिल्स स्टार...'; त्याला पाहताच भाषण थांबवून राज ठाकरेंनी केलं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2023 10:07 AM

'रिल'कर्त्यांचा 'रिलबाज २०२३' हा पुरस्कार सोहळा मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिर येथे आयोजित करण्यात आला होता.

मुंबई: रिल्स स्टारवर खूप मोठी जबाबदारी आहे. केवळ भंकसपण करता कामा नये, तर महाराष्ट्रात होत असलेल्या चुकीच्या गोष्टीवर तुमच्या रिल्समार्फत प्रबोधन झाले पाहिजे; पण राजकारण ज्या थरावर गेले त्या थरावर तुम्ही जाऊ नका, असा सल्ला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रिल्स स्टार्सना मंगळवारी दिला.

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या इंस्टाग्रामवर रिल्सद्वारे आंतरराष्ट्रीय लोकप्रियता मिळवलेल्या 'रिल'कर्त्यांचा 'रिलबाज २०२३' हा पुरस्कार सोहळा मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिर येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी राज ठाकरेंनी मार्गदर्शन केले. राज ठाकरे म्हणाले की, रिल करणारे जे करतात ते महत्त्वाचे आणि मोलाचे आहे. गायक, लेखक, कलाकार, सिने, साहित्य, नाट्य, गायन, शास्त्रीय संगीत असेल या विविध अंगामध्ये आज तुम्हीदेखील येता, असं राज ठाकरेंनी सांगितले. 

रिल्समध्ये संपूर्ण समाज गुंतवून टाकण्याची ताकद आहे. समाज तुमच्यात गुंततो, रममाण होतो. देशात जर असे मनोरंजन नसते तर देशात अराजक आले असते. आशाताई भोसले यांचा माझ्या हस्ते सत्कार होता. त्यावेळी मी एक गोष्ट सांगितली होती. तुम्ही किती महत्वाचे काम करता, याची जाणीव तुम्हाला व्हायला हवी. मला वाटते महाराष्ट्रातील डान्सबार जेव्हा बंद झाले. त्यावेळी लागलेली सवय ती या रिल्सच्या माध्यमातून पूर्ण झाली. एकएकटे बसलेले असतात, काय सुरू आहे काही कळत नाही. माझ्या नजरेत काही जण येतात, असंही राज ठाकरेंनी सांगितले. 

अथर्व सुदामे राज ठाकरेंचा आवडता रिल्स स्टार-

आपलं भाषण सुरु असतानाच राज ठाकरेंना समोर अथर्व सुदामे दिसला आणि त्यांनी थेट माईकवरुनच त्याच्याशी संवाद साधण्यास सुरुवात केली. "अरे तू पण आलायस का? हा माझा आवडता अत्यंत. हा हा उभा राहा!" असं राज ठाकरेंनी म्हणताच सभागृहामध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला. राज ठाकरेंनी सांगितल्यानंतर अथर्व जागेवर हसत उभा राहिला आणि त्याने वाकून आपल्या जागेवरुन राज ठाकरेंनी केलेल्या कौतुकाला नमस्कार करत प्रतिसाद दिला.

टॅग्स :राज ठाकरेमनसेसोशल मीडिया