मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी महाराष्ट्रानं मला सर्वकाही दिलंय, मला आता काहीही नको, असे म्हणत भावनिक ट्विट केलं आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने शरद पवारांचा राज्यभर दौरा सुरू असून तरुणाईकडून या दौऱ्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. जिथ जाईल तिथं पवार विरोधकांवर आणि आपल्या पक्षातून दुसऱ्या पक्षात केलेल्या नेत्यांवर जोरदार प्रहार करत आहेत. तर, या वयातही पवारांची ही ऊर्जा पाहून कार्यकर्ते कौतुक करत असताना, मी अजून म्हातारा झालो नाही, असे म्हणत पवारांकडून या दौऱ्याला बळ देण्याचं काम करण्यात येत आहे.
निवडणुकांची आचारसंहिता जाहीर होताच, निवडणूक प्रचाराचा वेग वाढणार आहे. मात्र, त्यापूर्वीच भाजपा आणि राष्ट्रवादीने यात्रांच्या माध्यमातून महाराष्ट्र पिंजून काढलाय. तर, काँग्रेस आणि शिवसेनाही गावागावात पोहोचण्याचा प्रयत्न करतेय. मात्र, या सर्वच यात्रा आणि सभांमध्ये शरद पवार यांचे दौरे चर्चेचा विषय बनत आहेत. मोदी आणि फडणवीसांवर पवार शाब्दिक वार करत आहेत. ''सीमेवर पुलवामासारखी घटना घडली नाही, तर राज्यात येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सत्ताबदल नक्की होईल, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला. मराठवाड्यात केवळ निरोपावर आयोजित केलेल्या दौऱ्याला युवकांमधून मिळालेला प्रतिसाद अभूतपूर्व असाच होता, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शरद पवार यांनी चार दिवसांपूर्वी सोलापूर येथून सुरू केलेल्या महाराष्ट्रव्यापी दौºयात मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याचे आयोजन केले होते. मराठवाड्यातील कार्यकर्त्यांचा प्रतिसाद आणि उत्साह पाहून तेथील दौऱ्यादरम्यान, पवारांनी भावनिक ट्विट केलंय. ''महाराष्ट्राने मला भरभरून दिलं. माझी आता कोणतीही इच्छा नाही. जनतेने मला चार वेळा मुख्यमंत्री केलं, देशाचा संरक्षण मंत्री केलं, 10 वर्षे कृषीमंत्री केलं. जनतेने मला भरभरून दिलं आहे. आता मला आणखी काही नको. अखेरच्या श्वासापर्यंत अवघ्या महाराष्ट्रासाठी काम करणे हीच माझी इच्छा आहे.'' असं भावनिक ट्विट पवारांनी केलंय. पवारांच्या या ट्विटची सोशल मीडियावरही चर्चा रंगली आहे.
औरंगाबाद येथे मेळावा झाल्यानंतर पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या आधी सीमेवर पुलवामा घडले. त्याचा लाभ राज्यकर्त्यांना झाला. त्यांनी सर्जिकल स्ट्राईक करीत पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देत असल्याचा संदेश जनतेत पोहोचवला. मी देशाच्या संरक्षण विभागाचा कारभार बघिलेला आहे, त्यामुळे काही सेवानिवृत्त लष्करी अधिकारी ओळखीचे आहेत. या लष्करी अधिकाºयांना ‘पुलवामा’ घडला की घडवला याबद्दल शंका आहे; पण मी हा देशाचा विषय आहे म्हणून त्यावर बोलू नका, असे स्पष्टपणे सांगितले. पुलवामा घडण्यापूर्वी सत्ताधारी जाणार अशीच स्थिती होती. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत पुलवामासारखी घटना घडली नाही, तर सत्ताबदल नक्की होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.