Join us

डॉग थेरपी करणाऱ्या मायराला टाटामध्ये आणले...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2024 10:15 AM

या श्वानासोबत टाटा रुग्णालयाच्या ओपीडीमध्ये आणण्यात आले होते.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : कॅन्सरवर उपचार मुलांना सुसह्य व्हावेत, यासाठी टाटा रुग्णालयात  ‘डॉग थेरपी’ सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी जानेवारी २०२३ पासून ते जुलै २०२४ पर्यंत मायरा नावाच्या श्वानाचा वापर करण्यात येत होता. ते श्वान रतन टाटा स्वतः पुण्याला जाऊन घेऊन आले होते. दोन महिन्यांपूर्वी मायरा या कामातून निवृत्त झाली होती, मात्र टाटा यांच्या निधनाचे वृत्त कळताच टाटा याना आदरांजली म्हणून मायरा श्वानाला गुरुवारी पुन्हा सुफी या श्वानासोबत टाटा रुग्णालयाच्या ओपीडीमध्ये आणण्यात आले होते.

मायराची कथा वेगळीच आहे. टाटा यांचे विश्वासू सहकारी शंतनू नायडू यांना पुणे येथे एक कुत्रा रस्त्यावर सोडून देण्यात आल्याचीही माहिती मिळाली होती. त्यांनी ती टाटा यांना कळविली. त्यानंतर त्या श्वानाला घेण्यासाठी स्वतः टाटा पुण्याला गेले. त्या श्वानाला घेऊन मुंबईत आले. तोच हा मायरा. टाटांनी त्याच्यावर औषध उपचार केले. ते नियमितपणे त्याला बघण्यासाठी ताज वेलिंग्टन म्यूजमध्ये जात होते. डॉग थेरपिस्ट बेहरोज मेस्त्री यांना त्याची माहिती मिळाल्यानंतर त्याही मायराला पहायला गेल्या. मायराला त्यांनी प्रशिक्षण देण्यात सुरुवात केली. त्या डॉग थेरपिस्ट असल्याने त्या व्यसनमुक्ती, ऑटिझम आणि कॅन्सरग्रस्त मुलाच्या थेरपीसाठी डॉगचा वापर करत असतात. २०२३ पासून टाटा रुग्णालयातील कॅन्सरग्रस्त मुलांसाठी ही थेरपी सुरू केली आहे.  

मायराचा वापर मेस्त्री यांनी अशा रुग्णांसाठी  सुरू केला. आठवड्याच्या मंगळवारी आणि गुरुवारी सकाळी ९:३० ते ११ या वेळेत लहान मुलांच्या ओपीडी परिसरात बेहरोज मेस्त्री ही थेरपी सेवाभावी वृत्तीने देतात. मिस्त्री या श्वानाच्या साहाय्याने विविध खेळ घेऊन मुलांना अनौपचारिक शिक्षणासह शारीरिक स्वच्छता व रुग्णालयातील उपचार याची माहिती देतात. त्यामध्ये श्वानासोबत नाचणे, त्याला खाऊ घालणे, यामध्ये मुलांना सहभागी करून घेतले जाते. त्याचा मुलांवर सकारात्मक परिणाम होतो, असे डॉक्टरांनी सांगितले.    

जुलैमध्ये मायराला निवृत्त करण्यात आले. त्यामुळे दोन महिन्याचा खंड या थेरपीमध्ये पडला होता. मात्र त्याची जागा काही दिवसांपूर्वीच सुफी नावाच्या श्वानाने घेतली आणि पुन्हा हा उपक्रम सुरु करण्यात आला.  

मायरा श्वानाला टाटांनी  पुणे येथून सोडवून मुंबईत आणले होते. त्याची प्रकृती सुधारल्यानंतर ते माझ्याकडे आले. त्यानंतर आम्ही त्याला प्रशिक्षण देऊन टाटा रुग्णालयातील थेरपीसाठी वापरू लागलो. टाटा यांचे श्वानप्रेम निर्विवाद आहे. त्यांनी प्राण्यांसाठी खूप मोठी व्यवस्था केली आहे.  - बेहरोज मेस्त्री, डॉग थेरेपिस्ट

 

टॅग्स :रतन टाटाटाटा