मर्यादापुरुषोत्तम राम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:06 AM2021-04-16T04:06:45+5:302021-04-16T04:06:45+5:30
------------------------------ अश्वमेध यज्ञ पूर्ण, हो ऋतु सहा, द्वादश हो मास, चैत्र नवमी ही पहा, पाच ग्रह उच्च, नक्षत्र पुनर्वसु, ...
------------------------------
अश्वमेध यज्ञ पूर्ण, हो ऋतु सहा,
द्वादश हो मास, चैत्र नवमी ही पहा,
पाच ग्रह उच्च, नक्षत्र पुनर्वसु,
कर्क राशी असती लग्नी, चंद्र नी गुरू,
कौसल्येस दिव्य असा, पुत्र जाहला,
जगदीश्वर, पूजनीय, राम जन्मला।
विष्णूचा अवतार, इश्वाकुनंदन,
लोहिताक्ष महाबाहु, उच्च रोदन,
इंद्रवरे, तेजस्वी, अदिती शोभते,
कौसल्या पुत्रयोगे,तशीच भासते,
गगनातून सुमनांचा, वर्षाव जाहला,
जगदीश्वर, पूजनीय, राम जन्मला।
धर्मरक्षणार्थ घेई, विष्णु जन्म हा,
रावण वध करण्यास्तव, राम अवतार हा,
सूर्यवंशी प्रतिसूर्यच, उदय पावला,
त्रैलोक्य जयकार करी, उल्हास जाहला,
जगदीश्वर पूजनीय, राम जन्मला।
रामाला आपले देवत्व लोकांना दाखवून द्यावेसे वाटले नसेल का? अहल्येचा उद्धार रामाने केला, तेव्हाही त्याचे अवतारित्व कसे लोकांना कळले नाही? त्यानंतर परशुरामाने स्वतः रामाचे अवतारित्व मान्य केले. परशुराम म्हणतात, ‘हे धनुष्य धारण केल्यावरून मी तुला अक्षय्य असा सुरश्रेष्ठ विष्णू समजत आहे.’ प्रत्यक्ष परशुराम असे म्हणाले, तरी रामाचे अवतारित्वाची चर्चा लोकांमध्ये कशी झाली नाही? अशोकवनात असलेल्या सीतेला हनुमान जेव्हा भेटतो, तेव्हा तो आधी एका झाडावर बसून रामाची स्तुती गातो,
जय जय राम, जय श्रीराम, मर्यादापुरुषोत्तम राम,
शत्रुतापन राम राम, शीलसंपन्न ज्ञानी राम,
तेजस्वी सूर्यासम राम, विनीत वेदवेत्ता राम,
जीवलोक रक्षक राम, धर्मरक्षक योद्धा राम।
वाल्मीकी रामायणात लिहिले आहे, सीतेने जेव्हा अग्निप्रवेश केला, तेव्हा भगवान शंकर, ब्रह्मदेव, देवेंद्र, यम वगैरे सगळे देव विमानातून एकत्रच लंकेत श्रीरामाजवळ उपस्थित झाले. त्यांना पाहून हात जोडून उभ्या असलेल्या रामाला ते सुरश्रेष्ठ ब्रह्मदेव म्हणाले,
तूच कर्ता या विश्वाचा, ज्ञाता, श्रेष्ठ विभू,
श्रीनारायण, चक्रायुध प्रभू, तूच असशी रामा,
तूच वराह, काल शत्रूचा जेता, तूच रामा।
तूच अक्षर ब्रह्म सत्य, सर्व काली, रामा,
परम धर्म लोकांचा, चतुर्भुज, विष्णू तू रामा।
हृषिकेश तू अजित पुरुष, पुरुषोत्तम रामा,
खड्गधारी, महाबलशाली, कृष्ण तूच रामा।
बुद्धी सत्य, क्षमा निग्रह, सृष्टी तूच रामा,
प्रलयाचे कारण तू, उपेंद्र, तूच रामा।
परमात्मा तू हृदयामधला, विराट पुरुष रामा,
अस्तित्व ना जगा तुझ्याविण, विश्वच तू रामा।
सीता साक्षात असे लक्ष्मी, विष्णू तूच रामा,
दिव्यरूपधारी परमात्मा, असे तूच रामा।
दशरथाच्या यज्ञाच्या वेळी सर्व देवांचा प्रतिनिधी म्हणून ब्रह्मदेवानेच श्रीविष्णूला रावणवध करण्यासाठी अवतार घेण्याची प्रार्थना केली होती. विष्णूने ती मान्य केली होती. ब्रह्मदेवाने रामाला, म्हणजे विष्णूला त्या गोष्टीचे स्मरण करून दिले. राम हा शब्दच मुळी अत्यानंद देणारा आहे. आश्वासक आहे.
राम नाम हे अंतर्यामी, जपणे अवगत आहे,
जीवन म्हणजे भक्तियोग हा, माथा अवनत आहे।
वाणीने रामनाम घ्यावे, कानाने रामाच्या कथा ऐकाव्यात, डोळ्याने रामाची मूर्ती पहावी. जेव्हा निवांत क्षण मिळतात, तेव्हा एकांतात श्रीरामाचे चिंतन करावे. तो मेघःश्याम डोळ्यापुढे आणावा. त्याचे ते सुंदर रूप, त्याचे ते कमळासारखे डोळे, त्याच्या चेहऱ्यावरील आश्वासक भाव, अहाहा त्याचे रूप नितांत संदर आहे. त्याचे ते कोदंडधारी रूप. काय हिंमत आहे कळीकाळाची आपल्याला घाबरवायची? रामाच्या कथा परत परत स्मराव्यात. त्यातून दरवेळी अधिकाधिक भावार्थ उमगत जातो. खरोखर अशाने जीवन एक भक्तीयोग बनून जाते. भगवंताशी नातं जोडलं जातं. ओळखू या आपण की, राम अनादी, आनंदघन आहे. परब्रह्मस्वरूप आहेत. तो धर्मात्मा आहे. धर्मवत्सल आहे. धर्मज्ञ आहे.
रक्षणकर्ता तो जीवाचा, स्वजनांचा अन् धर्माचा,
महापराक्रमी राम, समर्थ, काळ असे तो शत्रूचा
मर्यादापुरुषोत्तम राघव, आदर्श असे तों नात्यांचा
रघुवंशज धर्मात्मा प्रेमळ, कैवारी तो भक्तांचा।
राम जिवलग सखा सोबती, साक्षी असे तो जन्माचा,
राम तुझा माझा तो, स्वामी साऱ्या विश्वाचा,
पुन्हा पुन्हा सारे मिळूनी, गजर करूया रामाचा,
श्रीराम राम राम हा जप करताना, धन्य धन्य होई वाचां।
- सौ. शैलजा शेवडे