मुंबई : आग्रीपाडा येथील इमारत क्रमांक २३ व २४ च्या पटांगणात ‘म्हैसूर पॅलेस’ची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. मंडळाच्या ४३ व्या वर्षानिमित्त अंबामातेच्या भक्तांसाठी हा विशेष नजराणा असल्याची माहिती, आग्रीपाडा सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळाचे अध्यक्ष गणेश पुगावकर यांनी सांगितले.पुगावकर म्हणाले की, ‘गणेशोत्सवानंतर आलेल्या मुसळधार पावसामुळे म्हैसूर पॅलेस उभारण्यास अवघ्या १० दिवसांचा कालावधी मिळाला. मात्र, भक्तांसाठी अवघ्या १० दिवसांत ही सुंदर प्रतिकृती उभारण्यावर मंडळ ठाम राहिले. अंबामातेच्या आशीर्वादाने ही प्रतिकृती तयार करण्यात मंडळ यशस्वीही ठरले. सेल्फी काढण्यासाठी तरुणाईची या ठिकाणी गर्दी होते.मंडळाचे सचिव एकनाथ चांदूरकर म्हणाले की, ‘सांस्कृतिक कार्यक्रमांसोबतच मंडळाचा सामाजिक उपक्रमांवरही भर असतो. वर्षभर चालवण्यात येणाऱ्या उपक्रमांत विभागातील नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत मदत करण्यासाठी मंडळाने रुग्णवाहिकेची व्यवस्था केलेली आहे.दरम्यान, रक्तदान आणि मधुमेह तपासणीच्या शिबिराचे आयोजन नवरात्रौत्सव कालावधीत केले आहे.’ (प्रतिनिधी)आदिवासींना मदत : पेण, पनवेल येथील आदिवासी पाड्यांतील विद्यार्थ्यांना मदत म्हणून मंडळाकडून वह्यांचे वाटप केले जाते. याशिवाय मंडळाच्या मालकीच्या वास्तूमध्ये अभ्यासिकेची सोय आहे. या ठिकाणी यूपीएससी आणि एमपीएससीची पुस्तके उमेदवारांना पुरवण्यात येतात. हा उपक्रम वर्षभर सुरू असल्याचेही चांदूरकर यांनी सांगितले.
आग्रीपाड्यात ‘म्हैसूर पॅलेस’ची प्रतिकृती!
By admin | Published: October 05, 2016 3:37 AM