मुंबई : तलावात सापडलेल्या ‘त्या’ धडाचे गूढ अखेर ११ वर्षांनी उलगडले आहे. व्यसनी पतीच्या जाचाला कंटाळून पत्नीनेच त्याच्या हत्येसाठी २ लाखांची सुपारी दिली आणि पतीची धारदार शस्त्राने हत्या करत त्याचे अवशेष विविध ठिकाणी दडविण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे. त्यानंतर तिनेच पती हरविल्याची तक्रार पोलिसांत दिली होती.बन्सीबेन किसन खारवा (६०) असे पत्नीचे नाव असून तिच्यासह फिरासत अली अल्लारखाँ शाह (४८), इरशाद अली अल्लारखाँ शाह (४३) यांना अटक करण्यात आली आहे.नागपाडा येथील मस्तान तलाव परिसरात १४ मे २००६ रोजी मानवी धड आढळून आले. जे.जे. मार्ग पोलीस हत्येचा तपास करीत होते. मृतदेहाची ओळखच पटत नसल्याने काही वर्षांनी तपासाची फाइल बंद करण्यात आली. काही दिवसांपूर्वी एमआरए मार्ग पोलिसांना या हत्याकांडासंदर्भात पुसटशी माहिती मिळाली आणि तपासाची फाइल पुन्हा उघडून शोध सुरू झाला. पोलीस उपायुक्त मनोज शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली एमआरए मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुखलाल वर्पे, तपास अधिकारी गुलाबराव मोरे, रागिणी भगत, संदीप सावंत, रवींद्र पाटील, किरण पाटील आणि अंमलदारांनी तपासाची धुरा हाती घेतली. खबºयांमार्फत मौलाना शौकत अली रोड येथून पोलिसांनी शाह बंधूंना ताब्यात घेतले. त्यांच्या चौकशीत या कटात महिला असल्याचे उघड झाले. त्यानुसार पोलिसांनी बन्सीबेनला नागपाडामधून अटक केली आणि मृतदेहाचे गूढ उलगडले.
११ वर्षांनी उलगडले ‘त्या’ मृतदेहाचे गूढ, पत्नीसह तिघांना अटक, एमआरए मार्ग पोलिसांची कामगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 2:14 AM