Join us

पोलिसांच्या बार धाडीनंतर पत्रकाराचा गूढ मृत्यू

By admin | Published: July 18, 2015 4:55 AM

मीरा रोड पोलिसांच्या एस.के. स्टोन पोलीस चौकीला लागून असलेल्या व्हाइट हाउस बारवर पोलिसांनी १६ जुलै रोजी रात्रीच्या सुमारास टाकलेल्या धाडीचे वृत्तांकन करण्यास गेलेल्या तीन

- हल्ल्यात दोघे जखमी भार्इंदर : मीरा रोड पोलिसांच्या एस.के. स्टोन पोलीस चौकीला लागून असलेल्या व्हाइट हाउस बारवर पोलिसांनी १६ जुलै रोजी रात्रीच्या सुमारास टाकलेल्या धाडीचे वृत्तांकन करण्यास गेलेल्या तीन पत्रकारांवर बारचालकासह सुमारे २० ते ३० कर्मचाऱ्यांनी प्राणघातक हल्ला केला. यात दोन जण गंभीर जखमी झाले असून, तिसऱ्याने पोलीस चौकीचा आसरा घेतल्याने तो बचावला. चौथ्या पत्रकाराची चौकीपासूनच काही अंतरावर संशयास्पदरीत्या हत्या झाल्याचा प्रकार शुक्रवारी (१७ जुलै) पहाटे ५.३० वा.च्या सुमारास उजेडात आला आहे. बारवर रेड टाकल्याची माहिती स्थानिक पत्रकार संतोष मिश्रा यांना मिळाल्यानंतर त्यांनी पत्रकार शशी शर्मा यांना संपर्क साधून इतर पत्रकारांना माहिती देण्यास सांगितले. शर्माने अनिल नोटीयाल यांना वृत्तांकनासाठी सोबत नेले. पोलीस बारबालांना ताब्यात घेण्यासाठी बारमध्ये गेले असताना मिश्रा, शर्मा व नोटीयाल घटनेचे वृत्तांकन करू लागले. याची माहिती बारचालक गणेश कामत याला मिळाल्याने त्याने दारूने भरलेला ग्लास मिश्राला फेकून मारला. ते पाहताच बारमधील इतर कर्मचाऱ्यांनी त्या तिघांवर हल्लाबोल केला. घटनेवेळी बारबाहेर पोलिसांचे एक वाहन उभे असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु तेथे पोलीस नसल्याने मिश्राने जीव वाचविण्यासाठी काशिमीराच्या दिशेने, तर शर्माने मीरा रोडच्या दिशेने पळ काढला. नोटीयालने लगतच्या चौकीचा आसरा घेतल्याने तो बारवाल्यांच्या तावडीतून बचावला. घटनेनंतर जखमी अवस्थेत शर्मा याने मीरा रोड पोलीस ठाणे गाठून उपाधीक्षक सुहास बावचे यांना घटनेची माहिती दिली. मिश्राचा संपर्क होत नसल्याने बावचे यांनी पत्रकार राघवेंद्र दुबे याला संपर्क साधून पोलीस ठाण्यात बोलावले. मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास दुबे पोलीस ठाण्यात पोहोचल्यानंतर तो पहाटे ५ वाजताच्या सुमारास तेथून काही पत्रकारांसह घटनेच्या ठिकाणी गेला. तेथून दुबे एकटा पोलीस चौकीच्या दिशेने निघाल्यानंतर पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास त्याचा मृतदेह त्याच परिसरात आढळला. त्याच्या डोक्याच्या मागील बाजूस जोरदार प्रहार करून त्याची हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करून बारचालक कामत, त्याचा ड्रायव्हर राजू, कर्मचारी शरद, मुकेश, दिनेश व इतर ६ ते ७ जणांसह १४ बारबालांना ताब्यात घेतले आहे. घटनेचे वृत्त कळताच पोलीस महानिरीक्षक प्रशांत बुराडे, पोलीस अधीक्षक राजेश प्रधान यांनी मीरा रोड येथे धाव घेऊन जखमींची भेट घेतली. (प्रतिनिधी)पत्रकारांवरील हल्ला : विरोधकांचा सभात्यागमुंबई - मीरा रोड येथे तीन पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याबाबत सरकारच्या वतीने निवेदन करण्यात येईल हे आश्वासन न पाळल्यामुळे विरोधकांनी शुक्रवारी विधान परिषदेत सभात्याग केला.विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मीरा रोड येथील हल्ल्यात एका पत्रकाराचा झालेला मृत्यू व दोन पत्रकार जखमी झाल्याबाबतचा मुद्दा औचित्याद्वारे उपस्थित केला होता. त्यावर सरकारच्या वतीने निवेदन करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र दुपारपर्यंत निवेदन करण्यात न आल्याने सरकार पत्रकारांवरील हल्ल्याबद्दल संवेदनशील नसून राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडली असल्याच्या निषेधार्थ सभात्याग करीत असल्याचे मुंडे यांनी जाहीर केले.