Join us

चेंबूरमधील आश्रमातील दोन तान्ह्या बाळांचा गूढ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2018 6:16 AM

माटुंगा येथील आश्रमातील तीन मुली गूढरीत्या गायब झाल्याची घटना ताजी असतानाच आता चेंबूरमधील आश्रमातील दोन तान्ह्या बाळांचा गूढ मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

मुंबई : माटुंगा येथील आश्रमातील तीन मुली गूढरीत्या गायब झाल्याची घटना ताजी असतानाच आता चेंबूरमधील आश्रमातील दोन तान्ह्या बाळांचा गूढ मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एक सहा महिन्यांच्या मुलीसह दहा महिन्यांच्या मुलाचा समावेश आहे. तर अन्य चार बाळांवर चेंबूरमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. २५ डिसेंबरला ख्रिसमसनिमित्त आश्रमशाळेत आयोजित कार्यक्रमात दिलेल्या खाण्यातून या सहा जणांना बाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.चेंबूरमधील घाटला गावामध्ये १९८४ सालापासून चिल्ड्रन वेल्फेअर ट्रस्टअंतर्गत गतिमंद तसेच अनाथ मुले, तान्ह्या बाळांचा सांभाळ करणारा आश्रम आहे. या आश्रमात मुलींचे प्रमाण अधिक आहे. काही मुलींचे पालक त्यांना सांभाळू शकत नसल्यामुळे त्यांची रवानगी आश्रमात करण्यात आली आहे. आश्रमात साधारणत: पंधरा वयोगटातील ५० मुले-मुली असून काही तान्ही बाळेही आहेत. त्यांचा सांभाळ करण्यासाठी अनेक आया येथे आहेत.मंगळवार, २५ डिसेंबर रोजी ख्रिसमस साजरा करण्यासाठी आश्रमात वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मुलांसाठी केकसह खाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. रात्री सर्व मुले खेळल्यानंतर जेवून झोपी गेली. पहाटे आश्रमातील १ ते बारा महिन्यांच्या सहा तान्ह्या बाळांना अचानक उलट्या, जुलाब सुरू झाले. या सहा बाळांना पहाटेच चेंबूरमधील झेन हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले. मात्र यातील सहा महिन्यांच्या खुशीवर उपचार सुरू असतानाच तिचा बुधवारी सकाळी सव्वासातच्या सुमारास मृत्यू झाला. तर दहा महिन्यांच्या जयदीपची प्रकृती अधिकच खालावल्याने त्याला विद्याविहारमधील कोहिनूर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान गुरुवारी पहाटे त्याचा मृत्यू झाला. या दोन्ही मुलांच्या गूढ मृत्यूमुळे त्यांचे पार्थिव जे. जे. रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे. दरम्यान, चेंबूरमधील झेन रुग्णालयातील इतर चार बाळांवर अजूनही उपचार सुरू आहेत. या सहा जणांना खाण्यातून बाधा झाल्याचे प्राथमिक अहवालातून समोर आले आहे.शवविच्छेदनानंतरच कारण येणार समोरमुलांच्या मृत्यूचे कारण अद्याप समजू शकले नसून शवविच्छेदन अहवालानंतरच त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण समोर येईल, त्यानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे गोवंडी पोलिसांकडून सांगण्यात आले.

टॅग्स :गुन्हेगारी