दिवसाला ३ ते ४ मुली होताहेत बेपत्ता...
मनीषा म्हात्रे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईतून गेल्या सहा महिन्यात ५३४ मुलींच्या अपहरणाची नोंद पोलीस दप्तरी झाली आहे. यापैकी ३८६ गुह्यांची उकल करण्यात आली आहे. मात्र, उर्वरित १४८ मुलींचे गूढ अद्याप कायम आहे. गेल्या वर्षीच्या याच सहा महिन्यांच्या तुलनेत यात १७९ने वाढ झाली आहे.
मुंबईतही अल्पवयीन मुलींच्या बेपत्ता होण्याच्या घटना डोके वर काढत आहेत. यात, लॉकडाऊनमुळे २०१९च्या तुलनेत गेल्या वर्षी याचे प्रमाण घटले आहे. मुंबई पोलिसांच्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षभरात ७७३ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या. अल्पवयीन असल्याने याप्रकरणी अपहरणाची नोंद करत अधिक तपास सुरू करण्यात आला. यापैकी ६७३ मुलींचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे. २०१९मध्ये १,३३४ मुलींच्या अपहरणाची नोंद झाली होती. त्यापैकी १,१९५ मुलींचा शोध घेण्यात यश आले.
तर गेल्या महिन्यात १०८ मुलींच्या अपहरणांची नोंद झाली. जानेवारी ते जूनदरम्यान ५३४ अल्पवयीन मुलींच्या अपहरणाची नोंद झाली आहे. यापैकी १४८ मुलींचे गूढ़ अद्याप कायम आहे. गेल्या वर्षी याच सहा महिन्यात ३५५ मुलींच्या अपहरणाच्या घटना घडल्या. त्यापैकी २७३ मुलींचा शोध घेण्यात आला होता.
कोणत्या वर्षात किती बेपत्ता (जून २०२१ पर्यंत)
वर्ष अपहरण शोध
२०२१ ५३४ ३८६
२०२० - ७७३ ६७३
२०१९ - १३३४ ११९५
क्षुल्लक कारणांतूनही सोडत आहेत घर
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, यातील बहुतांश मुली प्रेमप्रकरणातून पसार होत आहेत. काहीना फूस लावून पळवून नेण्याच्या घटनाही समोर आल्या आहेत, तर काही प्रकरणात क्षुल्लक कारणांतून घर सोडण्याच्या घटनाही समोर आल्या आहेत.
ऑपरेशन मुस्कान
मुंबई पोलिसांनी १ जून ते ३० जून दरम्यान राबविलेल्या ऑपरेशन मुस्कानअंतर्गत १४५ अल्पवयीन मुली आणि मुलांचा शोध घेतला आहे.
पालकांचीही जबाबदारी महत्त्वाची
आपला पाल्य काय करतो, यावर पालकांचा लक्ष असणे गरजेचे आहे. त्यामुळे त्याच्यावर लक्ष ठेवण्याचे आवाहन वेळोवेळी पोलिसांकड़ून करण्यात येत आहे.