लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महिलांवरील अत्याचाराचा प्रश्न ऐरणीवर असताना गेल्यावर्षी महाराष्ट्रातून ६३ हजार २५२ महिला बेपत्ता झाल्या. त्यापैकी २३ हजार महिलांचे गूढ़ अद्यापही कायम असल्याची धक्कादायक माहिती राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या (एनसीआरबी) अहवालातून समोर आली आहे.
एनसीआरबीने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्यावर्षी सर्वाधिक ४९ हजार ३८५ गुन्हे (महिलांविरोधी ) उत्तर प्रदेशात नोंदविण्यात आले. त्याखालोखाल पश्चिम बंगाल (३६,४३९), राजस्थान (३४,५३५) तर महाराष्ट्रात ३१,९५४ गुन्हे नोंद केले गेले. २०१९ च्या तुलनेत ५ हजार १९० ने गुन्ह्यांचे प्रमाण घटले आहे. गुन्ह्यांमध्ये घट झाली असली तरी परिस्थिती पूर्णत: नियंत्रणात आलेली नाही.
यात धक्कादायक बाब म्हणजे देशभरात महाराष्ट्रातून सर्वाधिक १ लाख ९५८५ जण बेपत्ता झाले आहेत. त्याखालोखाल मध्यप्रदेशचा क्रमांक लागतो. त्यामध्ये ६३ हजार २५२ महिलांचा समावेश आहे. त्यापैकी २३ हजार १५७ जणींंचा शोध अद्याप लागलेला नाही. यामध्ये दीड हजार अल्पवयीन मुलींचा समावेश आहे. मुली, महिला कुठे आहे? याबाबत पोलीस ठाण्यातील विशेष पथके शोध घेत आहेत. यात काही जणी प्रेमप्रकरणांतूनही निघून गेल्याचीही माहिती समजते.
...
प्रेमप्रकरणांतून ११६ जणींची हत्या
गेल्यावर्षी राज्यात २,१६३ हत्येच्या घटनांची नोंद झाली आहे. त्यामध्ये ५६४ महिलांचा समावेश आहे. त्यात प्रेमप्रकरणांतून ११६ तर अनैतिक संबंधातून १८३ जणीची हत्या करण्यात आली आहे तर कुठे हुंडाबळीच्याही महिला शिकार झाल्याचे दाखल घटनांवरून दिसून येत आहे.
....