Join us  

‘त्या’ अपहरणाचे गूढ अखेर उकलले

By admin | Published: April 13, 2017 1:30 AM

गेल्या तीन महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या १४ वर्षांच्या मुलाच्या अपहरणामागचे गूढ उकलण्यास मुलुंड पोलिसांना यश आले. वडील ओरडले म्हणून मुलाने घर सोडले. त्यानंतर १८ वर्षांपूर्वी

मुंबई : गेल्या तीन महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या १४ वर्षांच्या मुलाच्या अपहरणामागचे गूढ उकलण्यास मुलुंड पोलिसांना यश आले. वडील ओरडले म्हणून मुलाने घर सोडले. त्यानंतर १८ वर्षांपूर्वी स्वत: घर सोडलेल्या तरुणासोबत तो राहत असल्याची माहिती तपासात समोर आली. मुलुंड पोलिसांनी मुलाला कुटुंबियांच्या ताब्यात दिले आहे. तसेच याप्रकरणी आश्रय देणाऱ्या शंकर यादवला अपहरणाचा गुन्ह्यात अटक केली आहे. मुलुंड पश्चिमेकडील परिसरात १४ वर्षांचा मुलगा कुटुंबियांसोबत राहायचा. २ जानेवारीला तो घरातून गायब झाला. रात्री उशिरापर्यंत शोध घेऊनही तो न सापडल्याने कुटुंबियांनी मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. घटनेची गांर्भियाने दखल घेत पोलसांनी याप्रकरणी अज्ञाताविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. मुलगा शिकत असलेल्या शाळेतील शिक्षक, कर्मचारी आणि मुलाचे मित्र-मैत्रिणी, अन्य विद्यार्थ्यांकडेही पोलिसांनी चौकशी सुरू केली. मुलगा राहत असलेल्या घरापासून ते शाळा परिसर, मुलुंडची सर्व प्रवेशद्वारे आणि रेल्वेस्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणीसाठी ताब्यात घेतले. मात्र, काहीच धागादोरा पोलिसांना सापडत नव्हता. मुलगा अल्पवयीन असून त्याचा शोध लागत नसल्याने अखेर उच्च न्यायालयाने या गुन्ह्याचा तपास सीआयडीकडे वर्ग केला. तरीसुद्धा मुलुंड पोलिसांनी तपास थांबविला नाही. अखेर एका अज्ञात क्रमांकावरुन मुलाच्या आईच्या मोबाईलवर आलेला एक मिसकॉल मुलुंड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजाराम व्हनमाने यांनी हेरला. हाच धागा पकडून पोलिसांनी या मोबाईल नंबरचा तपशील आणि सीसीटीव्ही फुटेज याच्या मदतीने संशयित शंकिअर यादव याच्यावर पाळत ठेवली. यादव याच्यासोबत फिरताना हा मुलगा सीसीटीव्हीत कैद झाला होता. त्यानुसार मंगळवारी मुलुंड पोलिसांनी यादव याच्यासोबत मुलाला गोरेगाव येथून ताब्यात घेत अपहरणाचे गूढ उलगडले. (प्रतिनिधी)वडील ओरडल्याचा रागअभ्यासावरुन वडील ओरडले म्हणून या मुलाने घर सोडले. त्यानंतर रेल्वे स्थानकावर त्याची भेट शंकरसोबत झाली. शंकरसोबत ठाणे आणि मुंबईच्या कॅटरिंगमध्ये कामे करून स्वत:चा उदरनिर्वाह करत असल्याची माहिती मुलाने पोलिसांना दिली. शंकर याने देखील १८ वर्षांपूर्वी घर सोडून मुंबई गाठली होती.