बाहुबलीच्या हत्त्येचे रहस्य उलगडले
By Admin | Published: April 29, 2017 03:10 AM2017-04-29T03:10:53+5:302017-04-29T03:14:58+5:30
तब्बल दीड वर्षानंतर पुन्हा एकदा फिल्मी जगतावर ‘बाहुबली’चा फिवर पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे अखेर कटप्पाने बाहुबलीला का मारले,
मुंबई /डोंबिवली : तब्बल दीड वर्षानंतर पुन्हा एकदा फिल्मी जगतावर ‘बाहुबली’चा फिवर पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे अखेर कटप्पाने बाहुबलीला का मारले, याचे उत्तर ‘बाहुबली-२’मधून चाहत्यांना मिळाले आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने भारतात तब्बल १२५ कोटींचा गल्ला जमवला आहे.
देशभरात जवळपास ६ हजार ५०० स्क्रीन्सवर आणि जगभरात तब्बल ९ हजार चित्रपटगृहांत हा चित्रपट झळकला आहे.
हा सिनेमा हिंदी, मल्याळम, कन्नड आणि तेलगू भाषेत प्रदर्शित झाला आहे. मुंबईतील दाक्षिणात्य समाज अधिक असलेल्या माटुंगा, धारावी, रे-रोड अशा परिसरांतील चित्रपटगृहांत सर्वाधिक गर्दी दिसून आली.
तुफान गाजलेल्या ‘बाहुबली’ चित्रपटचा पहिला भाग अलिकडेच पुनर्प्रदर्शित करण्यात आला होता. पाठोपाठ दुसरा भाग शुक्रवारी प्रदर्शित झाला. बाहुबलीचा ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’ पाहण्यासाठी प्रेक्षकांनी चित्रपटगृहांत गर्दी केली होती.
‘बाहुबली-२’ चित्रपटाच्या अखेरीस असणारे संवाद या चित्रपटाच्या पुढच्या भागाविषयी उत्सुकता निर्माण करतात. त्यामुळे आता चाहत्यांना बाहुबली-३ची उत्सुकता आहे.
फेसबुक, टिष्ट्वटर आणि व्हॉट्सअॅपवर केवळ बाहुबलीचीच चर्चा आहे. या चित्रपटाविषयीच्या विनोदी, रंजक पोस्ट्सचा धुमाकूळ सोशल मीडियावर हिट होतो आहे. टिष्ट्वटरवर तर बाहुबलीचे अनेक हॅशटॅग ट्रेंड्समध्ये दिसून येत आहेत. (प्रतिनिधी)
‘हाउसफुल’मुळे नाराजी-
हा चित्रपट पहिल्याच दिवशी ‘हाउसफुल’ झाल्याने बऱ्याच सिनेमागृहांत सर्वात आधी हजेरी लावून प्रेक्षकांच्या पदरी निराशा आली. बऱ्याच सिनेमागृहांमध्ये अॅडव्हान्स बुकिंग झाल्याने प्रेक्षकांना परतीची वाट धरावी लागली.
रहस्य नव्हे... तर रिकॅपपासून सुरुवात
‘बाहुबली-२’मध्ये नेमके काय रहस्य आहे, याचा विचार चाहते करत होते. मात्र या चित्रपटाची सुरुवात रहस्यापासून नव्हे तर रिकॅपपासून होते, त्यानंतर हळूहळू या चित्रपटात प्रेक्षक गुंतून जातो. आधीच्या सिनेमापेक्षा या सिनेमात ग्राफिक्सचा दर्जा जास्त प्रभावित करणारा आहे.