मुंबईतील विद्यार्थ्याच्या मृत्यूचे गूढ कायम : शवविच्छेदनाचा अहवाल राखीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 03:04 AM2017-10-12T03:04:08+5:302017-10-12T03:04:26+5:30
मीरा रोड येथील सिंगापूर इंटरनॅशनल शाळेत शिकणाºया १७ वर्षीय विद्यार्थ्याचा मंगळवारी आकस्मिक मृत्यू झाला. मात्र अद्यापही त्याच्या मृत्यूचे गूढ कायम असल्याचे दिसून येत आहे.
मुंबई : मीरा रोड येथील सिंगापूर इंटरनॅशनल शाळेत शिकणा-या १७ वर्षीय विद्यार्थ्याचा मंगळवारी आकस्मिक मृत्यू झाला. मात्र अद्यापही त्याच्या मृत्यूचे गूढ कायम असल्याचे दिसून येत आहे. सर जे. जे. रुग्णालयातील डॉक्टरांनी शशांकचा शवविच्छेदनाचा अहवाल राखीव ठेवल्याची माहिती काशिमीरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सानप यांनी दिली.
सिंगापूर इंटरनॅशनल या पंचतारांकित संस्थेत शिकणारा शशांक राहुल अग्रवाल याचा मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास वर्गात अभ्यास करत बसलेला शशांक अचानक खाली कोसळला. अन्य सहकारी विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी त्याला जवळच्या भक्तीवेंदात रुग्णालयात नेले. परंतु, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.
शशांकच्या मृत्यूनंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह सर जे.जे. रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. मात्र अद्याप शशांकच्या मृत्यूचे कारण समजू शकले नाही. शशांकच्या मृत्यूप्रकरणी पोलीसांनी मृत्यूची नोंद केली असून तपास सुरु केला आहे. यासंबंधी शाळेतील सीसीटीव्ही फुटेजही मागविण्यात आले असल्याची माहिती पोलीसांनी दिली.