मनसुख हिरेन यांच्या मोबाइल सीडीआरमधून मृत्यूचे गूढ उलगडणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:07 AM2021-03-07T04:07:01+5:302021-03-07T04:07:01+5:30
एटीएसकडून तपास सुरू लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : ‘त्या’ स्काॅर्पिओचे मालक मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूबाबत तपास यंत्रणांच्या हाती ...
एटीएसकडून तपास सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ‘त्या’ स्काॅर्पिओचे मालक मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूबाबत तपास यंत्रणांच्या हाती अद्याप ठोस माहिती लागलेली नाही. त्यांचा मोबाइलही गायब असल्याने त्याचे सीडीआर काढले जात आहे. दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) शनिवारी ते ताब्यात घेतले. हिरेन यांना दोन दिवसांपासून आलेले मोबाइल आणि अखेरचा फोन कोणाचा आला होता, त्यांनी कोणाशी संभाषण केले होते, याचा उलगडा करण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराच्या परिसरात सापडलेल्या स्फाेटकांनी भरलेल्या स्काॅर्पिओ कारचे गूढ उकलण्यापूर्वी या कारच्या मालकाचा संशयास्पद मृत्यू झाला. त्यामुळे सध्या सर्वत्र चर्चेचा विषय बनलेल्या या प्रकरणाची पाळेमुळे शोधण्यासाठी महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) नव्याने युद्धपातळीवर तपास सुरू केला आहे. पेडर रोड येथील अँटिलिया बंगल्याचा परिसर आणि मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडलेल्या मुंब्रा खाडीचा परिसर धुंडाळून काढला. विविध पथके स्थापन करून सर्व शक्यता पडताळून संशयास्पद बाबी पडताळून पाहिल्या जात आहेत. या प्रकरणाचा तपास मुंबई क्राईम बँचकडून शनिवारी एटीएसकडे वर्ग करण्यात आला. त्यामुळे एटीएसचे जयजीत सिंह यांनी सकाळी घटनास्थळी जाऊन सर्व माहिती घेतली. मृत हिरेन यांच्या मृतदेहाची पाहणी करून त्याबाबत सूचना केल्या.
हिरेन यांच्या शवविच्छेदनाचा अहवाल शनिवारी मिळाला. त्यात त्यांच्या शरीरावर कोणत्याही खुणा किंवा जखमा नसल्याचे नमूद आहे. मात्र मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट करण्यात आलेले नाही. त्यामुळे मृत्यूचे गूढ कायम आहे. एटीएसकडून त्यांच्या मोबाइलवर आलेल्या कॉल्सच्या सीडीआरद्वारे पडताळणी केली जात असून संबंधितांना चौकशीसाठी बाेलावले जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.