मुंबईत प्लास्टिकच्या डब्यात तुकडे करून टाकलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; प्रेमसंबंधाच्या विरोधातून हत्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2024 06:55 AM2024-11-14T06:55:27+5:302024-11-14T06:55:54+5:30
हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह गोराईमध्ये आणून झुडुपांत फेकून देण्यात आला. प्लास्टिकच्या डब्यामध्ये या मृतदेहाचे तुकडे करून टाकण्यात आले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : गोराई येथे प्लास्टिकच्या डब्यामध्ये तुकडे करून टाकलेल्या मृतदेहाची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले आहे. या मृत व्यक्तीचे नाव रघुनंदन पासवान (वय २१) असे असून, तो बिहारचा रहिवासी आहे. प्रेमसंबंधाला असलेल्या विरोधातून ही हत्या झाल्याचा संशय असून, पोलिसांनी याप्रकरणी मुलीच्या भावाला बुधवारी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दरभंगा जिल्ह्यातील कान्होली गावचा रहिवासी असलेला वर्षभरापूर्वी रघुनंदन बिहारच्या एका रुग्णालयात काम करत होता. तेथे एका १७ वर्षीय मुलीला काही औषधे देऊन त्याने मदत केली. त्यावरून दोघांमध्ये मैत्री झाली आणि ती प्रेमसंबंधात बदलली. मात्र, मुलीच्या घरच्यांना ही बाब समजल्यानंतर तिच्या भावाने रघुनंदनला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यावर गावातील प्रमुखाने मुलीच्या कुटुंबीयांशी बोलून सदर प्रकरण मिटवले. त्यानंतर या मुलीला तिचे भाऊ मुंबईत घेऊन आले; परंतु रघुनंदन तिला संपर्क करत राहिला. यामुळे तिचे कुटुंबीय संतप्त झाले आणि त्यातच त्यांनी रघुनंदनची भाईंदरमध्ये हत्या केली. हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह गोराईमध्ये आणून झुडुपांत फेकून देण्यात आला. प्लास्टिकच्या डब्यामध्ये या मृतदेहाचे तुकडे करून टाकण्यात आले होते.
हा प्रकार पोलिसांच्या रविवारी निदर्शनास आला. त्यानंतर तपासाची चक्र सुरू करून मृतदेहाची ओळख पटवण्यात आली, तसेच या गुन्ह्यात ज्या ऑटोरिक्षाचा वापर करण्यात आला, त्याच्या चालकाला ताब्यात घेण्यात आले. त्याची सध्या पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. दरम्यान, गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी मुलीच्या दोन भावांपैकी एकाला पकडले असून इतरांचा शोध सुरू आहे. दरम्यान, हत्येआधी रघुनंदन त्याची प्रेयसी आणि तिच्या कुटुंबीयांच्या संपर्कात होता, असा दावा जितेंद्र पासवान यांनी केला.
अचानक पोचला मुंबईला
रघुनंदन हा गेल्या आठ महिन्यांपासून पुण्याच्या एका कंपनीत काम करत होता. दिवाळीच्या सुट्टीत तो घरी गेला होता. मात्र, ३१ ऑक्टोबरला मित्रांसोबत मुंबईला जात असल्याचे सांगून तो घरातून निघून गेला. त्यानंतर त्याचा फोन बंद होता. त्याच्याशी संपर्क होऊ न शकल्याने वडील पुण्याला गेले. त्याच्या मोबाइलचे शेवटचे लोकेशन अंधेरी असल्याचे समजताच त्यांनी अंधेरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. मुलीच्या भावांनी रघुनंदनला पुण्याला बोलावले. त्यानंतर मुंबईच्या दौऱ्यावर नेण्याच्या नावाखाली अंधेरीला आणत नशेचे औषध देऊन त्याची हत्या केली, असा आरोप जितेंद्र पासवान यांनी केला.
दारू प्यायला लावून केली हत्या
मुंबईला आल्यानंतर रघुनंदनने दारूच्या नशेत भाईंदरमध्ये राहणारा प्रेयसीचा भाऊ मोहम्मद सत्तार याला फोन केला. मोहम्मदने त्याला स्वतःकडे बोलावून दारू पाजली. त्यानंतर हत्या करून मृतदेहाचे तुकडे केले. एका दिवसानंतर १ नोव्हेंबर रोजी त्याने ते तुकडे प्लास्टिकच्या डब्यात भरून तो डबा गोराईतील झुडुपात फेकून दिला. दरम्यान या गुन्ह्यात अटक आरोपीचा सहभाग असल्याचे तपासात समोर येत असून रिक्षाचालकाला याबाबत काही माहिती नसल्याचा अंदाज पोलिसांकडून व्यक्त होत आहे.
टॅटूमुळे पटली मृतदेहाची ओळख
पोलिसांनी सांगितले की, रघुनंदनचे वडील जितेंद्र पासवान यांनी मुलाच्या उजव्या हाताच्या टॅटूवरून त्याची ओळख पटवली. त्यावर 'आरए अशी इंग्रजी अक्षरे लिहिली होती. रघुनंदनचे ज्या मुलीशी प्रेम होते, तिचे नाव 'ए' अक्षरावरून सुरू होते.