Join us

एन. के. आमीन यांच्या आरोपमुक्ततेला सीबीआयचा विरोध

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2018 6:27 AM

गुजरातचे पोलीस अधिकारी एन.के. आमीन यांची विशेष न्यायालयाने आरोपमुक्तता केली असली तरी सीबीआयने मात्र त्यांच्या आरोपमुक्ततेला उच्च न्यायालयात शुक्रवारी विरोध केला.

मुंबई : गुजरातचे पोलीस अधिकारी एन.के. आमीन यांची विशेष न्यायालयाने आरोपमुक्तता केली असली तरी सीबीआयने मात्र त्यांच्या आरोपमुक्ततेला उच्च न्यायालयात शुक्रवारी विरोध केला. सोहराबुद्दीनची पत्नी कौसरबाई हिचा मृतदेह जाळून टाकताना आमीन तेथे उपस्थित होते. आमीन यांना कौसरबाईचा मृतदेह जाळला त्या जागेवर उपस्थित राहण्याची आवश्यकता नव्हती, असा युक्तिवाद सीबीआयतर्फे अ‍ॅडिशनल सॉलिसीटर जनरल अनिल सिंग यांनी न्या. ए.एम. बदर यांच्या खंडपीठापुढे केला.सीबीआयच्या आरोपपत्रानुसार, शेख, कौसरबाई यांची हत्या गुजरात एटीएस व राजस्थान पोलिसांकडून बनावट चकमकीत करण्यात आली.कौसरबाईची हत्या केल्यानंतर मृतदेह अहमदाबादपासून १०० कि.मी. अंतरावरील इल्लोल गावी नेऊन जाळला. एटीएसचा ड्रायव्हर नथुबा जडेजाने सीबीआयला दिलेल्या जबाबात म्हटले की, मृतदेह जाळताना आमीनही हजर होते. ‘त्या वेळी आमीन गुन्हे अन्वेषण विभागाचे डीएसपी होते. त्यांचे कार्यक्षेत्र अहमदाबादपुरतेच होते. त्यामुळे इल्लोल येथे जाण्याचे कारण काय? यावरूनच आमीन कटाचा भाग होते, हे स्पष्ट होते,’ असा युक्तिवाद सिंग यांनी केला. मात्र, यास आमीन यांच्या वकिलांनी विरोध केला. जडेजा यानेच आमीन यांचे नाव घेतले. पण त्याचा जबाब सीबीआय ग्राह्य धरू शकत नाही. कारण त्याने विशेष कोर्टात साक्ष फिरवली आहे. तेथे आमीन हजर होते, याचा अर्थ ते कटात सहभागी होते, असा होत नाही. सीबीआयला दाव्याच्या समर्थनार्थ अतिरिक्त पुरावे द्यावे लागतील,’ असा युक्तिवाद आमीनतर्फे ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी यांनी केला.

टॅग्स :मुंबईकेंद्रीय गुन्हे अन्वेषण