Join us

"ना निती ना, नितीमत्ता"... धारावी मोर्चावरुन थेट नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2023 4:58 PM

मुंबईतील धारावी टी जंक्शनपासून हा मोर्चा सुरू झाला असून अदानींच्या कार्यालयापर्यंत जाणार आहे.

मुंबई - राज्य सरकारने मुंबईतील धारावी पुनर्विकास प्रकल्प करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार, ह्या प्रकल्पाचं काम अदानी उद्योग समुहाला देण्यात आलं आहे. त्यास, शिवसेना उद्धव ठाकरे गटाने विरोध दर्शवला आहे. त्यावरुन, आता चांगलंच राजकारण होताना दिसत आहे. अदानी उद्योगसमुहाकडून होणाऱ्या धारावीच्या पुनर्विकासाविरोधात ठाकरे गटाने पुकारलेल्या महामोर्चाला उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली सुरुवात झाली आहे. या मोर्चात शिवसैनिकांसह महाविकास आघाडी आणि डाव्या पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले आहे. त्यावरुन, भाजपा नेत्यांनी शिवसेना (उबाठा) आणि उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं आहे. 

मुंबईतील धारावी टी जंक्शनपासून हा मोर्चा सुरू झाला असून अदानींच्या कार्यालयापर्यंत जाणार आहे. धारावीचा पुनर्विकास अदानींनी करण्याऐवजी तो स्वत: सरकारने करावा, अशी प्रमुख मागणी ठाकरे गटातील मोर्चेकऱ्यांकडून करण्यात येत आहे. यासह, मोर्चाच्या माध्यमातून काही मागण्याही होत आहेत. मात्र, हा मोर्चा केवळ राजकीय हेतुने आणि आर्थिक लाभासाठी असल्याचा आरोपही शिवसेनेवर होत आहे. विरोधकांकडून या मोर्चावरुन उद्धव ठाकरेंवर पलटवार केला जात आहे. केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनीही ट्विटरवरुन धारावी पुनर्विकासाला विरोध करणाऱ्या शिवसेना आणि महाविकास आघाडीवर टीका केलीय. 

उध्‍दव ठाकरे व त्‍यांच्‍या नादी लागून कॉंग्रेस व इतर पक्ष अदानी उद्योग समुहाविरोधात आता धारावीमध्‍ये मोर्चा काढत आहेत. दुसरीकडे उद्धव ठाकरेंचे बगलबच्‍चे आदरणीय साहेबांच्‍या जीवावर उठलेल्‍या पाकिस्तानातील दाऊदच्‍या साथीदाराबरोबर पार्टीमध्‍ये नाचत आहेत. वा रे उध्‍दव ठाकरे.. असे म्हणत केंद्रीयमंत्री नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर थेट प्रहार केला.  मुख्‍यमंत्री असताना अडीच वर्षात धारावीकरांना उध्‍दव ठाकरे पाचशे चौरस फुटांचे घर देण्‍याचा निर्णय घेऊ शकले नाहीत. आता त्‍यासाठी मोर्चा काढत आहेत. सत्‍तेत असताना अडीच वर्षात तुम्‍ही का नाही दिले धारावीकरांना पाचशे चौरस फुटांचे घर?, असा प्रश्न राणेंनी विचारला आहे. तसेच, यांचे प्रेम धारावी आणि धारावीकरांवर नाही. यांचे खरे प्रेम टी.डी.आर. च्‍या मलईवर आहे. उध्‍दव ठाकरे यांना ना नीती, ना नितीमत्ता,  स्‍वार्थासाठी काही पण... असे म्हणत नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 

शिंदे गटानेही साधला निशाणा

ठाकरे गटाच्या आजच्या मोर्च्यावर हल्लाबोल करताना शिदेंच्या शिवसेनेचे नेते राहुल शेवाळे यांनीही निशाणा साधला. "मुंबईतल्या बांधकाम व्यवसायिकांची सुपारी घेऊन उद्धव ठाकरेंचा आजचा धारावीतला मोर्चा आहे. स्वतःच्या आर्थिक हितासाठी उद्धव ठाकरेंचा हा मोर्चा असून टीडीआरबद्दल उद्धव ठाकरेंनी केलेले आरोप खोटे आहेत. ते स्वतः अडीच वर्ष मुख्यमंत्री होते, तेव्हा धारावीबद्दल काही का केलं नाही?" असा खोचक सवालही शेवाळे यांनी विचारला आहे.

या आहेत मागण्या

१. धारावीच्या टीडीआरसाठी सकरारने स्वत:ची कंपनी नेमून द्यावी.  २. धारावीमधील सर्व निवासी आणि अनिवासी झोपडीधारकांना पात्र ठरवून धारावीतच त्यांचं पुनर्वसन करण्यात यावं ३. निवासी झोपडीधारकांनां ५०० चौरस फुटांपर्यंतचं घर मोफत द्यावं. ४. महानगरपालिकेच्या मालमत्ता विभागाच्या धारावीत असलेल्या चाळी आणि बिल्डिंगमधील रहिवाशांना ७५० चौफुटांचं घर मोफत द्यावं.५. धारावीतील झोपडपट्ट्यांमधून अनेक छोटेमोठे व्यवसाय चालतात, त्यांचं पुनर्वसन करण्यात यावं. ६. धारावीच्या पुनर्विकास प्रकल्पासाठी नव्याने सर्वेक्षण करून, निवासी, अनिवासी रहिवासी जाहीर केल्यानंतरच प्रकल्पाला सुरुवात करावी. ७. प्रकल्पाचं स्वरूप समजावं यासाठी मास्टर प्लान आधीच जाहीर करून सविस्तर माहिती देण्यात यावी