मुंबई : राज्याचा समतोल विकास व्हावा यासाठी ‘नाबार्ड’ने अविकसित भागांसाठी जादा निधी द्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी केले. नाबार्डकडून होणाऱ्या पतपुरवठ्याचा उद्देश कितपत सफल झाला, याचा दर तीन महिन्यांनी आढावा घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
नाबार्डने तयार केलेल्या वार्षिक पतपुरवठा आराखडा फोकस पेपरचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सह्याद्री अतिथिगृहावर झाले. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.
कृषिमंत्री दादा भुसे, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनीही विचार व्यक्त केले. यावेळी खासदार अनिल देसाई यांच्यासह नाबार्डचे महाप्रबंधक एल. एल. रावल, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, राज्य बँकर्स समितीचे प्रतिनिधी, रिझर्व्ह बँकेचे विभागीय संचालक अजय मिच्यारी, आदी उपस्थित होते.
पीक कर्ज देताना उद्दिष्टपूर्ती केली नाहीनाबार्डच्या या आराखड्यात उद्योग व इतर प्राथमिक क्षेत्रांच्या विकासासाठी ५.९४ लाख कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत तो आठ टक्क्यांहून अधिक आहे. राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी महात्मा जोतिबा फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ दिला. मात्र बहुतांश राष्ट्रीयीकृत आणि खासगी बँकांनी शेतकऱ्यांना नव्याने पीक कर्ज देताना उद्दिष्टपूर्ती केली नाही याबाबत मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली.