मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषणात दिलेल्या ‘त्या’ उदाहरणामुळे नाभिक समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी याबाबत पत्राद्वारे दिलगिरी व्यक्त केली आहे. परंतु पत्राद्वारे व्यक्त केलेल्या दिलगिरीने नाभिक संघटनांचे समाधान झालेले नाही. शनिवारी सायंकाळी नाभिक समाजाचे आणि सलून व ब्युटी पार्लर असोसिएशनचे प्रतिनिधित्व करणाºया संघटना आणि प्रतिनिधींची वांद्रे तलाव परिसरात बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ राज्यभरातील नाभिक कामगार पुढील आठ दिवस काळ्या फिती लावून काम करतील, असा निर्णय घेण्यात आला आहे.मुख्यमंत्री कार्यालयातून आलेल्या पत्रातून मुख्यमंत्र्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. परंतु हे पत्र मुख्यमंत्र्यांच्या कर्मचारी अथवा कार्यकर्त्याने लिहिलेले असू शकते. नाभिक समाजाच्या मागण्यांकडे मुख्यमंत्री मागील तीन वर्षांपासून दुर्लक्ष करत आहेत, असे संघटनांचे म्हणणे आहे. पुढील आठ दिवसांत मुख्यमंत्र्यांनी नाभिक समाजाच्या विविध संघटनांची बैठक बोलवावी. त्यांच्या मागण्यांबाबत चर्चा करावी आणि केलेल्या वक्तव्याबाबत माफी मागावी, असे म्हणणे महाराष्टÑ नाभिक महामंडळाचे राष्टÑीय अध्यक्ष भगवानराव बिडवे यांनी बैठकीत मांडले. १९ ते २५ नोव्हेंबर या कालावधीत नाभिक समाजाचे कार्यकर्ते काळ्या फिती लावून काम करतील. दरम्यान, पुणे जिल्ह्यातील पाटस येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी आघाडी सरकारच्या कार्यकाळावर टीका केली होती. अनावधानाने त्यांनी नाभिक समाजाचा उल्लेख करत उदाहरण दिले. परंतु या उदाहरणामुळे नाभिक समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आणि त्यानंतर नाभिक समाज आणि सलून व ब्युटी पार्लर असोसिएशनने याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला.
नाभिक संघटना काळ्या फिती लावून काम करणार, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वक्तव्याचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2017 2:00 AM