मुंबई : मुंबई महानगरात पायाभूत सुविधा प्रकल्पांतर्गत होणारी बांधकामे, रस्ते, पूल आदींसाठी वापरात येणाऱ्या साहित्याचा दर्जा व गुणवत्ता तपासणे यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या साहित्य चाचणी प्रयोगशाळेचे योगदान महत्त्वाचे आहे. या प्रयोगशाळेला राष्ट्रीय चाचणी व अंशशोधन प्रयोगशाळा अधिस्वीकृती मंडळ (एनएबीएल) यांच्याद्वारे मान्यता मिळाली आहे. हे राष्ट्रीय मानांकन मिळविण्यासाठी योगदान दिलेले अधिकारी व अभियंते यांचा सहआयुक्त अजित कुंभार यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र प्रदान करून सन्मान करण्यात आला. दरम्यान, साहित्य चाचणी प्रयोगशाळेला मान्यता मिळाल्यामुळे मुंबईतील रस्ते, पुलांची कामे आणखी मजबूत होणार आहेत. अंशशोधन प्रयोगशाळा अधिस्वीकृती मंडळाने पालिकेच्या प्रयोगशाळेची तपासणी केली. त्यानंतर, दि. २६ जुलै २०२२ रोजी प्रयोगशाळेला मान्यता मिळाली. यासाठी पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनाखाली विविध अधिकारी, अभियंते यांनी प्रयत्न केले. या चमूतील उपप्रमुख अभियंता रामचंद्र कदम, कार्यकारी अभियंता शंकर भोसले, सहायक अभियंता महेंद्र सपकाळ, दुय्यम अभियंता जितेंद्र राठोड, दुय्यम अभियंता अशोक कर्पे, दुय्यम अभियंता सुनील पाटकर, दुय्यम अभियंता रमेश बनकर, दुय्यम अभियंता वैभव घरत, दुय्यम अभियंता राहुल बाटे, लिपिक विजय चावडा, लिपिक अंबादास मिसाळ आदींना प्रशस्तीपत्र प्रदान करून त्यांचा सन्मान करण्यात आला.
साहित्य चाचणी प्रयोगशाळेचे महत्त्व काय? मुंबईभर पालिकेच्या विविध विभागांकडून विकासाची अनेक नवीन कामे तसेच दुरुस्ती आणि देखभालीची कामे करण्यात येतात.
या कामांमध्ये वापरण्यात येणाऱ्या साहित्य सामुग्रीची तपासणी करण्यासाठी प्रमुख अभियंता (दक्षता) विभागाच्या देखरेखीखाली मुंबई महानगरपालिकेची प्रयोगशाळा वरळी येथे १९५८ पासून कार्यरत आहे.
महानगरपालिकेच्या रस्ते, पूल, इमारत बांधकाम, इमारत देखभाल तसेच दुरुस्ती, मुंबई मलःनिसारण प्रकल्प, मलःनिसारण प्रचालन, मलःनिसारण प्रकल्प, जल अभियंता, पाणी पुरवठा प्रकल्प, पर्जन्य जलवाहिन्या, रुग्णालये, उद्याने आदी खात्यांमार्फत तसेच २४ विभाग पातळीवर अनेक प्रकारची तांत्रिक कामे करण्यात येतात.
मुंबई पालिकेच्या दक्षता विभागाने साहित्य चाचणी प्रयोगशाळेत विश्वासार्ह कार्य केले आहे. त्यामुळेच केंद्र सरकारच्या अखत्यारितील ‘एनएबीएल’कडून राष्ट्रीय मान्यता प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. साहित्य चाचणी प्रयोगशाळेला अशा प्रकारची राष्ट्रीय मान्यता मिळालेली मुंबई पालिका राज्यातील एकमेव पालिका आहे. आता साहित्याची गुणवत्ता तपासणी करताना प्रयोगशाळेला आता अधिक लक्ष द्यावे लागणार आहे. - अजित कुंभार, सहआयुक्त , मुंबई महानगरपालिका