लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: नद्यांचे प्रदूषण रोखण्याकरिता सर्वंकष काम करण्याची गरज आहे. त्यासाठी पर्यावरण, नगरविकास आणि जलसंपदा या खात्यांचा एक संयुक्त टास्क फोर्स तयार करण्यात येईल. या टास्क फोर्समार्फत राज्यातील सर्व नद्यांचे प्रदूषण रोखता यावे यासाठी उपाययोजना करण्यात येतील, अशी माहिती पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली.
पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणाऱ्या मुळा-मुठा नद्यांमध्ये थेट मैला पाणी सोडण्यात येते. औद्योगिक कारखान्यांमधील पाण्यामुळे मुळा-मुठा नद्यांच्या प्रदूषणात वाढ होत असल्याचा मुद्दा बापूसाहेब पठारे, शंकर जगताप आदींनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून उपस्थित केला होता. उद्योगांकडून सिवरेज ट्रीटमेंट प्लांट (एसटीपी) लावण्यात येत असतात. मात्र, त्यांची योग्य देखभाल न झाल्याने ते नीट कार्यरत राहत नाहीत. मात्र, अशा प्रकारे प्रक्रिया न करताच सांडपाणी सोडणाऱ्या उद्योगांवर नोटीस देऊन कारवाई करण्यात येतच असते; पण यात केवळ नोटीस न बजावता नद्यांच्या रक्षणासाठी अधिक व्यापक कार्य करण्याची गरज असल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या.
टास्क फोर्स स्थापन करणार
या विषयात नगर विकास, पर्यावरण, जलसंपदा अशा वेगवेगळ्या खात्यांचा संबंध येत असतो. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली या खात्यांचा संयुक्त टास्क फोर्स स्थापन करण्यात येणार आहे; नुकतेच तज्ज्ञांचे मार्गदर्शन शिबिर आयोजित केले होते असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.