मुंबई : रत्नागिरीच्या नाणार येथे उभारण्यात येणाऱ्या रिफायनरी प्रकल्पाला प्रचंड विरोध असल्याने, तो प्रकल्प मराठवाड्यात उभारा, अशी मागणी मराठवाडा अनुशेष निर्मूलन आणि विकास मंचाने केली आहे. तसे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल विद्यासागर राव यांच्याकडे केले आहे. मुंबई प्रेस क्लबमध्ये शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत विकास मंचाचे अध्यक्ष डॉ. संजय लाखेपाटील यांनी ही माहिती दिली.लाखेपाटील म्हणाले की, नाणार येथील विरोधामुळे मुख्यमंत्री संबंधित प्रकल्प गुजरातला जाण्याची भीती व्यक्त करत आहेत. मात्र, देशातील १० रिफायनरी प्रकल्प समुद ्रकिनाºयाहून दूर खडकाळ व वाळवंटी भागात आहेत. त्याच धर्तीवर नाणारचा प्रकल्प मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांमध्ये जागा, दळवळणाच्या सोईनुसार तातडीने मंजूर करण्याचा निर्णय सरकारने घ्यावा. मराठवाड्यात औरंगाबाद, जालना, डीएमआयसी शेजारी, औरंगाबाद-जालना महामार्ग, प्रस्तावित समृद्धी महामार्ग किंवा जालन्यातील ड्रायपोर्ट लगत प्रकल्प प्राधान्याने उभारता येईल. देशातील आसाममध्ये तीन, तर कर्नाटक, बिहार, उत्तर प्रदेश, हरयाणा, पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेश येथे प्रत्येकी १ असे १० रिफायनरी प्रकल्प किनारपट्टीशिवाय उभे आहेत.अत्याधुनिक इमिशन स्टँडर्डचा प्रकल्प असल्याने, मराठवाड्यातील पर्यावरणाला धोका नसल्याचे मंचाने सांगितले. मराठवाड्याच्या जीडीपीत प्रकल्पामुळे वाढ होईल. शिवाय मराठवाड्यावर होणारा अन्याय दूर करण्याची संधी मुख्यमंत्र्यांना मिळेल, असा दावा मंचाने केला आहे.
नाणार प्रकल्प मराठवाड्यात उभारा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 1:41 AM