माझगाव डॉकयार्डच्या विप्स संस्थेत महिला दिनानिमित्त उमटले नादवेणू अकादमीच्या बासरीचे सूर!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2023 04:31 PM2023-03-09T16:31:35+5:302023-03-09T16:32:08+5:30
ऐरोलीच्या नादवेणू अकादमीच्या विद्यार्थिनींनीनी बासरी वादनाने साजरा केला महिला दिन!
महिला दिनानिमित्त देशभरात तसेच राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. अशातच माझगाव डॉकयार्डच्या 'द फोरम ऑफ वुमन पब्लिक सेक्टर' अर्थात विप्स या सरकारी संस्थेत महिला विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात नृत्य, संगीत तसेच अन्य सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश करण्यात आला होता. सदर कार्यक्रमात नौदलाच्या प्रमुख अधिकाऱ्यांचीही उपस्थिती होती. अशातच बासरीच्या सुरांनी कार्यक्रमाची रंगत वाढवली.
विविध क्षेत्रात काम करणाऱ्या, शालेय तसेच महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या, तसेच गृहिणी व निवृत्त झालेल्या अशा एकूणच ११ ते ७० वयोगटातील महिलांनीदेखील या कार्यक्रमात बासरी वादन केले. त्या सगळ्या जणी ऐरोली येथील 'नादवेणू' या बासरी वादन अकादमीच्या विद्यार्थिनी होत्या. जेमतेम वीस मिनिटांच्या सादरीकरणाने त्यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
बासरीवादनात राष्ट्रगीताने सुरुवात झाली. ओम जय जगदीश, अच्युतम केशवम, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे या लोकप्रिय भजनांचे वादन झाले. त्यानंतर राग भूप आणि पहाडी यांच्या संमिश्र सुरावटींनी तयार केलेली भूपियामधील रचना सादर केली. त्यावेळेस नादवेणू अकादमीचे संचालक आकाश सूर्यवंशी, की-बोर्ड शुभम बोबडे, तबला आयुष तसेच लोगिता, अन्वी, गायत्री, विजयालक्ष्मी, राशी, रुपांबिका, निधी, चेतना, कौमुदी, प्राची, मेघा या विद्यार्थिनींचा समावेश होता.