मुंबई : दक्षिण मुंबईतील नागपाडा परिसरात रविवारी दुपारी साडेबारा वाजता बिस्मिल्ला स्पेस या बांधकामाधीन इमारतीतील पाण्याची भूमिगत टाकी साफ करताना चार कंत्राटी कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला, तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे.
भूमिगत असलेल्या रिकाम्या टाकीत तयार झालेल्या विषारी वायूमुळे ही दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. कामगार टाकीत उतरले तेव्हा त्यांच्याकडे कोणतीही संरक्षक साधने नव्हती. त्यामुळे या दुर्घटनेस विकासकाचे दुर्लक्ष कारणीभूत ठरल्याचे सांगण्यात येते.
नागपाडा येथील डीमटीमकर मार्गावर ही बांधकामाधीन इमारत आहे. दुर्घटनेप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करून विकासकाचीही चौकशी सुरू करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. हसीपाल शेख (१९), राजा शेख (२०), जियाउला शेख (३६) आणि इमानदू शेख (३८) अशी या दुर्घटनेतील मृत कामगारांची नावे आहेत. तर पुरहान शेख (३१) या कामगाराची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती जे. जे. रुग्णालय प्रशासनाने दिली.
दुर्घटना कशी घडली?
टाकीच्या साफसफाईसाठी कामगार आले तेव्हा बांधकाम अपूर्ण असल्याचे निदर्शनास आले. टाकी १० फूट खोल व ३९० चौरस फुटांची आहे. टाकीवर ठेवलेले प्लायवूड कापून एक कामगार टाकीत उतरला. मात्र त्याची काहीच हालचाल न जाणवल्याने त्याला पाहण्यासाठी दुसरा कामगार टाकीत उतरला. त्याचीही हालचाल जाणवली नाही, म्हणून तिसरा आणि त्यापाठोपाठ चौथा कामगारही टाकीत उतरला, मात्र चौघेही बाहेर आले नाहीत. शंका आल्याने पाचवा कामगार संरक्षक पट्टा बांधून टाकीत डोकावून पाहू लागला. मात्र तो गुदमरला. त्याला त्वरित बाहेर काढण्यात आले.