Join us

नागपूर हिंसाचार: अबू आझमी म्हणाले, "जिथे कधीही धार्मिक दंगली झाल्या नाहीत, तिथे..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 19:50 IST

Nagpur Riots Abu Azami: नागपूरच्या कायदा आणि सुव्यवस्थेला १७ मार्च रोजी गालबोट लागले. जाळपोळ झाली. पोलिसही हिंसाचारात भरडले गेले. 

Nagpur Latest Update: नागपूर शहरात झालेल्या हिंसाचारावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटल्या. नागपूरमध्ये घडलेल्या हिंसाचारासाठी अबू आझमी यांचे एक वादग्रस्त विधानही सत्ताधाऱ्यांकडून जबाबदार ठरवले गेले. या सगळ्या हिंसक झडपीनंतर अबू आझमी यांनी त्यांची भूमिका मांडली. नागपूरमधील हिंसाचाराने मी दुःखी आहे, असे सांगत त्यांनी कायदा हातात न घेण्याचे आवाहन केले आहे. 

 

अबू आझमी यांनी एका व्हिडीओद्वारे नागपूरच्या हिंसाचारबद्दल भाष्य केले आहे. नागपूरातही कधीही धार्मिक दंगली झाल्या नाहीत, असं नमूद करत त्यांनी लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले. 

देशाची गंगा जमुना संस्कृती

"मी व्यथित आहे. मी दुःखी आहे की, आज त्या नागपूरमध्ये जिथे कधीही धार्मिक दंगली झाल्या नाहीत. सगळे बंधुभावाने राहत होते. त्या नागपूरमध्ये इतका मोठा हिंसाचार झाला. अनेक लोक जखमी झालेत. मी एकच म्हणेन की, गंगा जमुना संस्कृती असलेला आपला देश आहे. कोणाच्याही चिथावणीला बळी पडू नका. रमजानचा महिना आहे", असे अबू आझमी यांनी म्हटले आहे. 

"मी सर्व हिंदू-मुस्लीम बंधूंना आवाहन करतो की, आपल्याला शांतता नांदू द्यायची आहे. देशाला पुढे घेऊन जायचे आहे. त्यामुळे आपसात वाद व्हायला नको. सगळ्यांनी शांतता बाळगावी. कायदा हातात घेऊन नये. इतकी मोठी घटना घडली आहे. कायदा त्याचं काम करेल. इतक्या लोक जखमी झालेत. कायदा त्याचं काम करेल, पण न्याय झाला पाहिजे", अशी अपेक्षा अबू आझमी यांनी व्यक्त केली आहे. 

ठाकरेंची फडणवीसांवर टीका

"गृहमंत्र्यांचे घर नागपूर आहे. आरएसएस मुख्य कार्यालय नागपूरमध्ये आहे. मग नागपूरमध्ये हिंदू खतरे में कसा?  इतकी वर्ष तुम्ही नेमकं काय केलं? जर पूर्वनियोजित असेल, तर मग तुमचं गृह खातं झोपा काढत होतं का? हा पूर्वनियोजित कट तुमच्या कानावर आला का नाही? आला असेल, तर तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं का? एका प्रश्नात अनेक प्रश्न दडलेले आहेत", असे म्हणत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना कात्रीत पकडण्याचा प्रयत्न केला. 

सत्ता तुमची, मंत्रीही तुमचेच -ओवेसींनी काय दिला सल्ला?

"महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे शहर आहे. हा जो हिंसाचार झालाय आहे, तो केंद्रीय मंत्र्यांच्या घराजवळ झाला आहे. हे खूप चुकीचे घडत आहे. तुम्ही सत्तेत आहात आणि तुमची जी विचारधारा आहे, ती बाजूला ठेवा. तुमची विचारधारा असायला हवी भारताचे संविधान आणि कायद्याचे पालन करणे. ६ डिसेंबर १९९२ ला काय घडलं? त्यानंतर सुप्रीम कोर्टाने त्याला अग्रीगेस अॅक्ट म्हटले. तर तुम्ही बघा. सत्ता तुमची आहे. मंत्री तुमचे आहे. कायद्याची पालन आणि अंमलबजावणी तुम्हाला करायची आहे", असे असदुद्दीन ओवेसी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून म्हणाले.

टॅग्स :औरंगजेबाची कबरअबू आझमीगुन्हेगारीनागपूर पोलीस