Join us

नागपुरी संत्र्यांचा पहिला कंटेनर वाशीहून दुबईला गुरुवारी झाला रवाना

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2020 5:45 AM

मध्य-पूर्व देशांत निर्यात वाढविण्यावर भर; एपीईडीएचा उपक्रम

हरीश गुप्ता ।लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : जगभरात प्रसिद्ध असलेल्या नागपूरच्या संत्र्यांची पहिला कंटेनर वाशीहून दुबईला गुरुवारी, १३ फेब्रुवारी रोजी रवाना झाला. व्हॅनगार्ड हेल्थ केअरच्या (व्हीएचसी) माध्यमातून पाठविलेल्या या वातानुकूलित कंटेनरमध्ये संत्र्यांचे १५०० क्रेट आहेत.

देशाच्या मध्य व पश्चिम प्रांतामध्ये संत्र्याच्या उत्पादनात दरवर्षी वाढ होत आहे. महाराष्ट्र राज्य कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार नागपूर जिल्ह्यातील ४० लाख हेक्टर क्षेत्रात संत्र्याची लागवड केली जाते. नागपूर व अमरावती जिल्ह्यातील वरूड, काटोल, सावनेर, कमळेश्वर, नारखेड ही ठिकाणे संत्र्याच्या उत्पादनाच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत. कृषी आयात धोरणाच्या (एइपी) अंमलबजावणीच्या दृष्टीने नागपूरी संत्र्यांसाठी नागपूर जिल्हा हा क्लस्टर म्हणून विकसित करण्यात येत आहे. हे काम कृषी व प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ निर्यात विकास प्राधिकरणाच्या (एपीइडीए) मुंबईतील अधिकाऱ्यातर्फे केले जात आहे.

यासंदर्भात नागपूर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ३० आॅक्टोबर २०१९ रोजी नागपूर येथे पहिली बैठक झाली. त्यानंतर क्लस्टर विकासासाठी एपीइडीए, नॅशनल रिसर्च सेंटर फॉर सायट्रस (एनआरसी), नागपूर जिल्हा कृषी विभाग, वानामती नागपूर, महाराष्ट्र राज्य कृषी विपणन मंडळ (एमएसएएमबी), डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, नागपूर एमएसएमइ, प्लांट क्वारंटाईन नागपूर, एमएएचए आॅरेंज या संस्थांच्या प्रतिनिधींचा समावेश असलेली एक समिती स्थापन करण्यात आली. त्याचप्रमाणे नागपूर क्लस्टरसंदर्भात माहिती देण्यासाठी संत्री विकणारा व विकत घेणाºयांची एक परिषद ५ डिसेंबर २०१९ रोजी नागपूरच्या वानामतीमध्ये आयोजिण्यात आली. त्यात शेतकरी व निर्यातदार यांनी परस्परांशी संवाद साधला. नागपूरमधील संत्र्यांची मध्य-पूर्वेतील देशात आयात वाढविणे व नागपूरी संत्र्यांच्या ब्रँड तेथील बाजारपेठेत प्रस्थापित होण्यासाठी प्रयत्न करणे हा या परिषदेचा मुख्य उद्देश होता.निर्यातदारांशी साधला संवाद६ डिसेंबर रोजी एपीइडीए, एमसीडीसी, राज्याचे कृषी खाते व निर्यातदार आदींच्या प्रतिनिधींसह संत्रीउत्पादक वरूड, काटोल, कमळेश्वर आदी भागांना भेट देऊन तेथील माहिती घेण्यात आली. त्यानंतर नागपूरची संत्री मोठ्या प्रमाणावर निर्यात करण्यात निर्यातदारांनी तयारी दाखविली. निर्यातदारांनी पुन्हा या भागाला जानेवारी महिन्यात भेट दिली. त्यानंतर एका निर्यातदाराने वरुड तालुक्यातील शेतकºयांकडून थेट संत्री खरेदी करून ती एपीइडीएचे आर्थिक सहाय्य असलेल्या वाशी येथील व्हीएचटी फॅसिलिटीमध्ये आणली. तिथून ती क्रेटमध्ये भरून तो पहिला कंटेनर दुबईला पाठविण्यात आला.

टॅग्स :आॅरेंज फेस्टिव्हल