लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मध्य रेल्वे प्रशासनाची कोरोना विरुद्ध लढाई सुरु आहे. लॉकडाऊन काळात मध्य रेल्वे देशभरात जीवनावश्यक वस्तूंची सुरळीत वाहतूक करत आहे. मागील एका महिन्यात नागपूरची संत्र्यांच्या २ हजार ४० पेट्या देशभरात पाठवली आहेत.
मध्य रेल्वेच्या मुंबई, नागपूर, पुणे, सोलापूर आणि भुसावळ विभागातून मागील एका महिन्यात २ हजार टनांहून जास्त जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक केली आहे. मध्य रेल्वेने या लॉकडाऊन काळात औषधे, नाशवंत वस्तू जीवनावश्यक वस्तू पाठविण्यासाठी वेळापत्रकानुसार २२० पार्सल गाड्यांची योजना आखलीआहे. यापूर्वीच १२५ गाड्या चालवण्यात आल्या असून ९५ गाड्या नियोजित आहेत. या पार्सल गाड्यांमधून मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने राऊरकेला आणि टाटानगर येथे ३९ टन वजनाचे संत्र्यांची पेट्या वाहून नेली आहेत. याशिवाय पार्सल गाड्यांमध्ये कोलकाता, गुवाहाटी, सिकंदराबाद, चेन्नई, झारसुगुडा, टाटानगर याठिकाणी संत्र्यांची पाकिटे, २१६ टन औषधे आणि इतर वैद्यकीय उपकरणांची वाहतूक केली आली.
देशात कोरोना विषाणूचा प्रतिकूल परिणाम लक्षात घेऊन आव्हानांची पूर्तता करण्यासाठी व सरकारच्या प्रयत्नांना बळकटी देण्यासाठी मध्य रेल्वेने वेळोवेळी पार्सल सेवेद्वारे औषधे, रुग्णालयातील वस्तू आणि इतर वैद्यकीय वस्तू, फळे, भाज्या, अंडी, ज्यूट बियाणे, टपाल बॅग, नाशवंत वस्तू आणि कच्चा मालाची वाहतूक करणे सुरू ठेवले आहे. २३ मार्चपासून ते २२ एप्रिलपर्यंत मध्य रेल्वेने ७० हजार ३७४ वॅगनमधून जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक केली आहे, असे मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.