मुंबई : कोस्टल रोडपाठोपाठ मुंबई महापालिकेचा गोरेगाव-मुलुंड हा महत्त्वांकाक्षी प्रकल्प असून, या मार्गावर तीन उड्डाणपूल बांधण्यात येणार आहेत. यात नाहूर रेल्वे स्थानकाजवळील पुलाचे बांधकाम पहिल्या टप्प्यात करण्यात येणार आहे. या पुलाचे पालिका हद्दीतील रुंदीकरण व पुनर्बांधकाम पूल विभागाने हाती घेतले आहे. यासाठी पालिका २२ कोटी रुपये खर्च करणार असून, पावसाळा वगळता पुढील १८ महिन्यांत ते काम पूर्ण होणे अपेक्षित आहे.
दरम्यान, पुलाचे रेल्वे हद्दीतील हे काम रेल्वेकडून करण्यात येणार असल्याने लवकरच गोरेगाव-मुलुंड लिंक रोडचा पहिला टप्पा मार्गी लागणार आहे. पूर्व-पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या गोरेगाव-मुलुंड लिंक रोडची लांबी १२.२ किमी आहे. त्यात संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरातून जाणाऱ्या प्रस्तावित भूमिगत बोगद्याची लांबी ४.७ किमी असेल. गोरेगाव फिल्म सिटीमधील प्रस्तावित बोगद्यासह भुयारी मार्गाची लांबी १.६ किमी असणार आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात लिंक रोडचे रुंदीकरण आणि बांधकामात सुधारणा करण्यात येणार आहे.
पूर्व-पश्चिम उपनगरात आता जलद प्रवास -
पश्चिम उपनगराला पूर्व उपनगराशी जोडण्यासाठी, तसेच दोन्ही ठिकाणची वाहतूक अधिक वेगवान व्हावी, यासाठी गोरेगाव-मुलुंड लिंक रोडचा प्रकल्प महत्त्वाचा आहे.
पवईमार्गे कांजुरमार्ग, तसेच जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड (जेव्हीएलआर), आरे कॉलनीमार्गे भांडुप असे सध्याचे पश्चिम उपनगरांतून पूर्व उपनगरात जाण्यासाठी मार्ग असले तरी पवई व जेव्हीएलआरला मोठी वाहतूककोंडी होत असल्याने मुंबईकरांचा वेळ आणि इंधनाची नासाडी होते. यावर पर्याय म्हणून महानगरपालिकेने जीएमएलआर हा प्रकल्प राबविण्याचे निश्चित केले आहे.
१) गोरेगाव-मुलुंड लिंक रोड १२.२ किमी
२) भूमिगत बोगद्याची लांबी ४.७ किमी
३) नाहूर स्थानकावरील पुलाच्या प्रवेश रस्त्यांचे बांधकाम हा त्याचाच भाग आहे.
प्रकल्पाचे तीन टप्पे...
१) हा प्रकल्प तीन टप्प्यांत राबविला जाणार असून, पहिल्या टप्प्यात नाहूर, दुसऱ्या टप्प्यात मुलुंड येथे पूर्व द्रुतगती महामार्गापासून तानसा जलवाहिनीपर्यंत आणि पश्चिम उपनगरात गोरेगाव येथे पश्चिम द्रुतगती महामार्गापासून फिल्म सिटी प्रवेशद्वारापर्यंतचे काम करण्यात येणार आहे.
२) तिसऱ्या टप्प्यात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून बोगदा, फिल्म सिटी प्रवेशद्वार ते संजय गांधी उद्यानाच्या हद्दीपर्यंत भूमिगत बॉक्स टनेल, विविध चौकांमधील उड्डाणपूल आणि भुयारी मार्गांचा समावेश आहे.