Join us

नायगाव बायपास प्रस्ताव रखडला

By admin | Published: July 28, 2014 1:54 AM

पश्चिम रेल्वेमार्गावरून कोकणकडे जाणाऱ्या मेल-एक्स्प्रेस गाड्यांना मोठा वळसा घालून जावे लागत आहे.

मुंबई : पश्चिम रेल्वेमार्गावरून कोकणकडे जाणाऱ्या मेल-एक्स्प्रेस गाड्यांना मोठा वळसा घालून जावे लागत आहे. या कटकटीतून सुटका करण्यासाठी म्हणून नायगाव बायपास रेल्वेमार्गाचा प्रस्ताव पश्चिम रेल्वेकडून बनवण्यात आला. मात्र त्यावर अद्याप निर्णय झालेला नसून, प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाकडेच पडून असल्याची माहिती पश्चिम रेल्वे महाव्यवस्थापक हेमंत कुमार यांनी दिली. पश्चिम रेल्वेवरील अनेक मेल-एक्स्प्रेस वांद्रे टर्मिनसवरून सुटल्यानंतर वसई स्थानकाच्या दिशेने जाऊन आणि पुन्हा मागे येऊन पनवेलकडे जात आहेत. पनवेलकडे जाण्यासाठी दुसरा मार्गच नसल्याने त्यांना असा मोठा मार्ग पत्करावा लागत आहे. हा भला मोठा वळसा घालून जावा लागत असल्याने कोकणच्या दिशेने जाणाऱ्या गाड्यांना लेट मार्कला सामोरे जावे लागते. तर त्याचा परिणाम पश्चिम रेल्वेमार्गावरून गुजरात आणि त्यामार्गे धावणाऱ्यांवरही होतो. यातून सुटका करण्यासाठी म्हणून नायगाव बायपास रेल्वेरूळ टाकण्याचा रेल्वेने निर्णय घेतला. तब्बल ४५0 कोटी रुपये खर्च येणार असून, या प्रकल्पाला रेल्वे मंत्रालयाची मंजुरी मिळणे आवश्यक आहे. मात्र सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लोटूनही त्याला मंजुरी मिळालेली नाही. या प्रकल्पामुळे नायगावनंतर पनवेलकडे जाण्यासाठी दुसरा मार्ग रेल्वेकडून उपलब्ध होईल. या प्रकल्पाचे सर्वेक्षणही पूर्ण झाले आहे. (प्रतिनिधी)