मुंबई : बी.डी.डी. चाळीचा पुनर्विकास; तसेच एस.आर.ए. प्रकल्पामुळे पाणीपुरवठ्याची वाढती मागणी लक्षात घेता जास्त क्षमतेच्या जलवाहिन्या टाकाव्यात, अशी मागणी झाल्याने नायगाव परिसरात जलवाहिन्या टाकण्याचे काम तूर्तास स्थगित करण्यात आले आहे.
मुंबईलापाणीपुरवठा करण्यासाठी विविध जलाशये व उदंचन केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे. शिवडी-नायगाव परिसरात गोलंदाजी टेकडी जलाशय हा त्यापैकी एक आहे. या जलाशयातून नायगाव, परळ गाव आणि काळेवाडी येथे पाणीपुरवठा केला जातो. येथील २ उदंचन केंद्र १९९६ मध्ये उभारण्यात आले आहेत.
या पंपांचे आयुर्मान संपल्यामुळे ते सतत बिघडत असतात. त्यामुळे दैनंदिन पाणीपुरवठ्यावर परिणाम होत असतो. ते बदलण्याचे काम हाती घेण्यात आले होते. मागील वर्षाभरापासून या कामाचे नियोजन सुरू आहे. मात्र, या कामास आक्षेप घेण्यात आला होता. गोलंदाजी हिल जलाशयातून प्रभाग क्रमांक २०१ ते २०६ प्रभागातील नागरिकांना पाणीपुरवठा होतो. यातील नायगाव विभागात बी.डी.डी. चाळ पुनर्विकासाचे काम सुरू आहे. अन्य प्रभागात एस.आर.ए.मार्फत पुनर्विकासाची कामे सुरू आहेत. भविष्यात या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाण्याची गरज भासणार आहे.
नवी निविदा काढावी-
इथे ५० मीटरपेक्षा जास्त क्षमतेचे पंप बसवणे आवश्यक आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेली निविदा प्रक्रिया रद्द करावी, नवी निविदा काढावी, अशी मागणी ठाकरे गटाचे माजी नगरसेवक सचिन पडवळ यांनी पालिकेकडे केली होती. या मागणीची दखल घेण्यात आली आहे. कार्यकारी अभियंता जल कामे (नियोजन व संशोधन) या विभागाचा अभिप्राय येईपर्यंत निविदा प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे, असे पालिकेतर्फे सांगण्यात आले.