- गौरी टेंबकरमुंबई - गोरेगावच्या नेस्को आयटी पार्कमध्ये असलेल्या खासगी कंपनीत असोसिएट मॅनेजर म्हणून नोकरी करणाऱ्या २६ वर्षीय वकिलाला नायका कंपनीच्या नावे हजारोंचा चुना लावण्यात आला. खरेदीवर ५० टक्के कॅशबॅक आणि आयफोन मिळेल असे सांगत ही फसवणुक करण्यात आली असून याविरोधात त्यांनी वनराई पोलिसात तक्रार दिली आहे.
तक्रारीनुसार, २० फेब्रुवारी रोजी दुपारी बाराच्या सुमारास तक्रारदार वकीलाला एका मोबाईल क्रमांकावरून फोन आला. फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीने तो नायका कंपनीतून बोलत असल्याचे सांगत त्यांना कंपनीकडून विविध ऑफर दिल्या जात असल्याचे त्याने सांगितले. यामध्ये त्यांनी कमीत कमी ५ हजार रुपये खर्च केल्यावर ५० टक्के कॅशबॅक तसेच आयफोन १४ प्लस १२८ जीबी मिळेल असे सांगण्यात आले. त्यानंतर तक्रारदाराच्या मोबाईल क्रमांकवर व्हाट्सअप मेसेजद्वारे ऑफरची माहितीही पाठविण्यात आली.
तेव्हा सदर वकिलाने नायका ॲपवर जाऊन १६ हजार ७५४ रुपयांचे वेगवेगळे प्रॉडक्ट ऍड केले. तसेच फोनवरून सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या अकाउंटवर गुगल पे ॲपवरून सदर रक्कम आणि आयफोनच्या जीएसटी च्या नावाखाली १४ हजार ४९० रुपये आणि रक्कम चुकीची भरली असे सांगितल्याने पुन्हा तितकीच रक्कम पुन्हा पे केली. मात्र हे पैसे रिफंड करायला सांगितल्यावर सदर कॉलरने त्यांचा नंबर ब्लॉक केला. तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि या विरोधात त्यांनी वनराई पोलिसात तक्रार केली. याप्रकरणी पोलिसांनी अनोळखी व्यक्तीच्या विरोधात भारतीय दंड संहिता कलम ४२० तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६(सी), (डी) अंतर्गत गुन्हा दाखल केला.