Join us  

प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांवर नाईक पुत्रांचा एल्गार

By admin | Published: May 27, 2014 12:31 AM

प्रकल्पग्रस्तांसह शहरातील विविध प्रलंबित प्रश्नांच्या पूर्ततेसाठी आता पालकमंत्री गणेश नाईक यांच्या दोन्ही पुत्रांनी सिडकोच्या विरोधात एल्गार पुकारला आहे.

नवी मुंबई: प्रकल्पग्रस्तांसह शहरातील विविध प्रलंबित प्रश्नांच्या पूर्ततेसाठी आता पालकमंत्री गणेश नाईक यांच्या दोन्ही पुत्रांनी सिडकोच्या विरोधात एल्गार पुकारला आहे. माजी खासदार संजीव नाईक आणि आमदार संदीप नाईक यांनी आज सिडको अध्यक्ष प्रमोद हिंदूराव यांची भेट घेवून प्रलंबित प्रश्नांची जंत्री सादर केली. येत्या आठ दिवसांत या प्रश्नांची तड लावा, अन्यथा २ जून रोजी धडक मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा नाईक बंधूंनी सिडकोला दिला आहे. सिडको संबंधित प्रश्न सोडविण्यासाठी पालकमंत्री गणेश नाईक यांच्या पुढाकाराने तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या कारकिर्दीपासून ते आतापर्यंतच्या मुख्यमंत्र्यांसमवेत झालेल्या बैठकांची माहिती राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने यावेळी सिडको अध्यक्ष हिंदूराव यांना सादर केली. या अविरत पाठपुराव्यामुळे राज्य सरकारने १ मे २००७ रोजी एक अध्यादेश काढून प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याचा आदेश दिला आहे. मात्र सिडकोने या आदेशाची अंमलबजावणी आतापर्यंत का केली नाही, असा सवाल संजीव नाईक यांनी यावेळी उपस्थित केला. गरजेपोटी बांधलेली घरे ही मूळ गावठाणापासून २०० मीटर परिघाच्या क्षेत्रफळाऐवजी ५०० मीटर परिघाच्या क्षेत्रफळापर्यंत नियमित करावीत, गावठाणातील प्रकल्पग्रस्तांची घरे नियमित करावी, साडेबारा टक्के भूखंड वाटपाची प्रक्रिया तत्काळ पूर्ण करावी. सिडकोनिर्मित धोकादायक इमारतींचा २.५ एफएसआयच्या माध्यमातून पुनर्विकास करावा. महानगरपालिकेने सिडकोनिर्मित धोकादायक इमारतींच्या पुनर्वसनासाठी तयार केलेल्या अ‍ॅसेसमेंट प्लॅनला मंजुरी द्यावी. औरंगाबादच्या धर्तीवर महापालिकेच्या हद्दीतील सिडकोच्या सोसायट्यांच्या जमिनी फ्री होल्ड कराव्यात. रेल्वे प्रकल्पग्रस्तांचे तातडीने पुनर्वसन करावे, गावालगत जागा घेवून बांधलेली घरे ऐरोलीतील शिव कॉलनीच्या धर्तीवर नियमित करावीत, पात्रतेतून वजा केलेले भूखंड नवीन जागेत द्यावेत, सिडकोकडील आरक्षित सुविधा भूखंड नवी मुंबई महापालिकेकडे हस्तांतरित करावेत आदींसह नवी मुंबईकरांना भेडसावणार्‍या अनेक प्रश्नांवर संजीव नाईक आणि संदीप नाईक यांनी आज सिडको अध्यक्ष हिंदूराव यांच्याबरोबर चर्चा केली. या प्रश्नांच्या पूर्ततेसाठी येत्या २ जून रोजी सिडको भवनवर धडक मोर्चा काढण्यात येणार असल्याचे संजीव नाईक यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी कोकण विभागीय आयुक्त, एमआयडीसी प्रशासनालाही मागण्यांचे निवेदन देण्यात आले. दरम्यान, सिडको प्रशासनाने अनेक विकासकामांत हेळसांड केली असल्याचे यावेळी हिंदूराव यांनी मान्य केले. येत्या आठवडाभरात शासन स्तरावर आपण स्वत: यापुढे या समस्या सोडविण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.