नैना क्षेत्रात सरकारने सिडकोचे पंख छाटले

By admin | Published: February 23, 2016 03:31 AM2016-02-23T03:31:51+5:302016-02-23T03:31:51+5:30

नवी मुंबई विमानतळ प्रभावित क्षेत्रातील २७० गावांतील सुमारे ६०० चौरस किलोमीटर परिसरासाठी स्थापन केलेल्या नैना प्राधिकरणासाठीची विशेष हेतू कंपनी म्हणून सिडकोकडे जबाबदारी

In the Naina area, the government has ceded wings | नैना क्षेत्रात सरकारने सिडकोचे पंख छाटले

नैना क्षेत्रात सरकारने सिडकोचे पंख छाटले

Next

- नारायण जाधव,  ठाणे
नवी मुंबई विमानतळ प्रभावित क्षेत्रातील २७० गावांतील सुमारे ६०० चौरस किलोमीटर परिसरासाठी स्थापन केलेल्या नैना प्राधिकरणासाठीची विशेष हेतू कंपनी म्हणून सिडकोकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मात्र, आता या परिसरात मोडणाऱ्या मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे आणि जुन्या मुंबई-पुणे महामार्गाच्या मधील सुमारे २ चौरस किलोमीटर परिसरातील खालापूर आणि पनवेल तालुक्यांतील ८४ गावांच्या २०० चौरस किलोमीटर क्षेत्रात एमएसआरडीसी आता स्वत:ची स्मार्ट सिटी उभारणार आहे. यासाठी या परिसराच्या नियोजन प्राधिकरणाची जबाबदारी राज्य शासनाने एमएसआरडीसी अर्थात रस्ते विकास मंडळाकडे सोपवून एक प्रकारे सिडकोचे पंख छाटले आहेत.
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुकावगळता रायगडच्या खालापूर तालुक्यातील ६७ आणि पनवेल तालुक्यातील १७ गावांचा समावेश आहे. यात या दोन्ही महामार्गांच्या दक्षिण आणि पश्चिमेकडील दोन किलोमीटर क्षेत्र गृहीत धरले आहे. या वृत्तास एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी दुजोरा दिला आहे. ते म्हणाले, सध्या हे क्षेत्र नैनात मोडत असले तरी या परिसरात बांधकाम व्यावसायिकांसह इतरांकडून एनए परवानगी घेऊन कसाही विकास करण्यात येत आहे. त्यांचे बांधकाम प्रकल्प उभे राहत आहेत. नियोजनबद्ध विकास होत नसल्याने मुंबई आणि पुणे यासारख्या दोन मोठ्या महानगरांच्या मधला हा परिसर बकालपणे विकसित होत आहे. त्यामुळे या परिसरासाठी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून एमएसआरडीसीकडे जबाबदारी सोपवावी, ही आमची विनंती शासनाने मान्य केली आहे. त्यानुसार, आम्ही या सुमारे २०० चौरस किलोमीटर क्षेत्रात सुसज्ज अशी स्मार्ट सिटी विकसित करणार आहोत. या स्मार्ट सिटीत एंटरटेन्मेंट झोन, इंडस्ट्री झोन, रहिवासी झोन असणार असून सर्वांना दोन्ही महामार्गांना जोडण्यात येणार आहे. यामुळे सर्व प्रकारच्या वाहतूक व्यवस्थेचा एक अत्याधुनिक नमुना या शहरात पाहायला मिळणार असून ही स्मार्ट सिटी विमानतळ, महामार्ग आणि जलमार्गांना जोडलेली राहणार असल्याचे मोपलवार यांनी स्पष्ट केले.

विकास आराखड्यांचे काय...
सिडकोने नैनातील पायलट प्रोजेक्ट म्हणून पनवेल
तालुक्यातील २३ गावांचा आराखडा तयार करून शासनाकडे मंजुरीस पाठविला आहे.
त्याला मंजुरी मिळण्याआधीच आता ही ८४ गावे एमएसआरडीसीत गेल्यास त्या आराखड्याचे काय, असा प्रश्न निर्माण होत आहे.

पनवेल तालुक्यातील १७ गावे
गिरवली, आजिवली, अरवली, आष्टे, शेडुंग, कासलखंड, कान्हवले, भाटणे, बारवी, भोकरपाडा, जताडे, सोमाटणे, नारपोली, दहिवली, सावले, देवलाली बु. आणि दापिवली.

...तर आमचा आक्षेप
नैना हा ६00 चौरस किलोमीटरचा विशाल प्रकल्प आहे. त्यातील काही गावांचा विकास करण्याचा एमएसआरडीसीचा प्रस्ताव आहे. पहिल्या टप्प्यात २३ गावांचा विकास करण्याची सिडकोची योजना आहे. त्यास धक्का लागणार असेल तर आमचा आक्षेप राहील. मात्र नंतरच्या टप्प्यातील गावांच्या विकासाला वेळ लागणार आहे. त्यामुळे त्यापैकी काही गावांच्या विकासाचे काम एमएसआरडीसीकडे देण्यात येत असेल तर आमची काहीच हरकत नाही.
- संजय भाटिया, व्यवस्थापकीय संचालक, सिडको

Web Title: In the Naina area, the government has ceded wings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.