‘नायर’मध्ये प्लाझ्माद्वारे ५२ रुग्ण कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2020 04:16 AM2020-08-27T04:16:59+5:302020-08-27T04:17:14+5:30
कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांनी प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पालिकेच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
मुंबई : कोरोनाची लागण झालेल्या रुग्णाला इतर आजार असल्यास त्याची विशेष काळजी घ्यावी लागते. अनेक वेळा असे रुग्ण अत्यवस्थ स्थितीत जातात आणि त्यांचा मृत्यू होतो. मात्र, आता अशा रुग्णांना वाचवणे शक्य होणार आहे. महानगरपालिकेने सुरू केलेल्या या महत्त्वाकांक्षी उपचार पद्धतीला यश आले असून आतापर्र्यंत तीन गंभीर रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. नायरमधील आतापर्यंत ५२ रुग्ण प्लाझ्मा उपचार पद्धतीच्या माध्यमातून कोरोनामुक्त झाले आहेत.
मुंबईत महानगरपालिकेच्या माध्यमातून कोरोना रोखण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना केल्या जात आहेत. या उपाययोजनांमुळे रुग्णसंख्या नियंत्रणात आली आहे. कोरोनाबाधित रुग्णांवर इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च(आयसीएमआर)च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार प्लाझ्मा उपचारही सुरू करण्यात आले आहेत. यासाठी महापालिकेचे मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालय प्लाझ्मा थेरेपी केंद्र्र बनवण्यात आले आहे. या प्लाझ्मा केंद्राच्या माध्यमातून आतापर्यंत ५२ रुग्णांवर केलेल्या उपचारांनंतर संबंधित रुग्ण कोरोनामुक्त झाले असल्याची माहिती डॉ. रमेश भारमल यांनी दिली.
कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांनी प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पालिकेच्या माध्यमातून करण्यात आले आहे. ‘आयसीएमआर’च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार महापालिकेच्या माध्यमातून प्रायोगिक तत्त्वावर ही उपचारपद्धती सुरू होती. मात्र, आता कोरोनाबाधित रुग्ण अत्यवस्थ असला तरी डॉक्टरांनी परवानगी दिल्यास प्लाझ्मा थेरपी करता येणार असल्याचे डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले.