नायर दंत महाविद्यालय देशात दोन सर्वेक्षणांमध्ये ठरले अव्वल; सार्वजनिक क्षेत्रात तिसरा क्रमांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 10:18 AM2021-08-29T10:18:06+5:302021-08-29T10:18:29+5:30

सर्वोत्कृष्ट म्हणून पाचवे, तर सार्वजनिक क्षेत्रात तिसरा क्रमांक

Nair Dental College topped the country in two surveys pdc | नायर दंत महाविद्यालय देशात दोन सर्वेक्षणांमध्ये ठरले अव्वल; सार्वजनिक क्षेत्रात तिसरा क्रमांक

नायर दंत महाविद्यालय देशात दोन सर्वेक्षणांमध्ये ठरले अव्वल; सार्वजनिक क्षेत्रात तिसरा क्रमांक

googlenewsNext

मुंबई : देशातील सर्वात जुन्या दंत महाविद्यालयांमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे रुग्णालय असा नावलौकिक असणाऱ्या आणि दरवर्षी तब्बल साडेतीन लाखांपेक्षा अधिक रुग्णांवर दंतोपचार करणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नायर दंत महाविद्यालयाच्या शैक्षणिक व सोयी-सुविधांविषयक कामगिरीची दखल नुकतीच दोन राष्ट्रीय स्तरावरील सर्वेक्षणांमध्ये घेण्यात आली आहे.

‘आऊटलुक’ साप्ताहिकाने देशभरातील सार्वजनिक क्षेत्रातील दंत महाविद्यालयांमध्ये तिसरे स्थान देत पालिकेच्या नायर दंत महाविद्यालयाचा गुणगौरव केला आहे. तर ‘द वीक’ या नियतकालिकाने देशभरातील सर्वोत्कृष्ट दंत महाविद्यालयांमध्ये नायर दंत महाविद्यालयाला पाचवे स्थान दिले आहे.

एकाचवेळी राष्ट्रीय स्तरावरील दोन वेगवेगळ्या सर्वेक्षणांमध्ये अग्रेसर ठरल्याने नायर दंत महाविद्यालयाच्या शैक्षणिक कामगिरीसह तेथील सुविधांचा देखील राष्ट्रीय स्तरावर गौरव झाल्याचे नमूद करीत नायर दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. नीलम अंद्राडे यांनी सांगितले की, मार्च २०२० पासून उद्भवलेल्या कोविड काळात नायर दंत महाविद्यालय आणि दंत रुग्णालय अव्याहतपणे कार्यरत आहे.

कोविडसारख्या साथरोगाच्या परिस्थितीत दंत वैद्यकीय सेवा देताना साथरोगाचा संसर्ग होऊ नये, या दृष्टीने काळजी घेणे क्रमप्राप्त आहे. मात्र, हे आव्हान नायर दंत महाविद्यालयातील विद्यार्थी, कामगार, कर्मचारी, अधिकारी आणि प्राध्यापक व शिक्षक मंडळी समर्थपणे हाताळत आहेत. अधिकाधिक नावीन्यपूर्ण व गुणवत्तेला प्राधान्य देणाऱ्या सेवांचा नियमितपणे विस्तार करणाऱ्या नायर दंत महाविद्यालयात एकावेळी ३५० पेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत असतात. यामध्ये ५ वर्षीय पदवी अभ्यासक्रमाचे विद्यार्थी आणि ३ वर्षीय पदव्युत्तर दंत वैद्यकीय अभ्यासक्रमाचे विद्यार्थी, अशा दोन्ही अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांना ज्ञानदान करण्यासाठी ५७ प्राध्यापक (शिक्षक) या महाविद्यालयात आहेत.

 महाविद्यालयांच्या कामगिरीचे सर्वेक्षण

‘द वीक’ या साप्ताहिकाच्या पुढाकाराने देशपातळीवरील सार्वजनिक व खासगी क्षेत्र मिळून विविध दंत वैद्यकीय महाविद्यालयांच्या कामगिरीचे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात नायर दंत वैद्यकीय महाविद्यालयाला देशभरात ५ वा क्रमांक देण्यात आला आहे. ‘द वीक’च्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या अंकात हे वृत्त प्रकाशित झाले आहे.

बहुस्तरीय मूल्यमापन

‘आऊटलुक’ या साप्ताहिकाच्या पुढाकाराने देशभरातील सार्वजनिक आणि खासगी अशा निवडक दंत वैद्यकीय महाविद्यालयांच्या कामगिरीचे बहुस्तरीय मूल्यमापन करण्यात आले. या सर्वेक्षणात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नायर दंत वैद्यकीय महाविद्यालयाने शासकीय महाविद्यालय गटामध्ये तिसरे स्थान पटकाविले आहे.  ‘आऊटलुक’च्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या अंकात ही यादी प्रकाशित झाली आहे.

Web Title: Nair Dental College topped the country in two surveys pdc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.