मुंबई : देशातील सर्वात जुन्या दंत महाविद्यालयांमध्ये दुस-या क्रमांकाचे रुग्णालय असा नावलौकिक असणा-या, दरवर्षी तब्बल साडेतीन लाखांपेक्षा अधिक रुग्णांवर दंतोपचार करणा-या महापालिकेच्या नायर दंत महाविद्यालयाच्या कामगिरीची दखल यावर्षी ३ राष्ट्रीय स्तरावरील सर्वेक्षणांमध्ये घेण्यात आली आहे. राष्ट्रीय स्तरावरील सर्वेक्षण नियतकालिक, साप्ताहिकाने केले आहे, अशी माहिती नायर दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. नीलम आंद्रादे यांनी दिली.
नायर दंत महाविद्यालय आणि रुग्णालयाची स्थापना १९३३ मध्ये झाली. १८ डिसेंबर रोजी ८७ व्या वर्षात पदार्पण करत असलेले हे रुग्णालय देशातील सर्वात जुने असे दुस-या क्रमांकाचे दंत रुग्णालय व महाविद्यालय आहे. दरवर्षी सुमारे साडेतीन लाख रुग्णांना वैद्यकीय सेवा देणा-या या रुग्णालयात ९ सुपरस्पेशालिटी विभाग आहेत. १८७ डेंन्टल चेअर असून, उपचारासाठी भरती होणा-या रुग्णांसाठी २० खाटांचा अद्ययावत विभाग आहे. स्वतंत्र व समर्पित शस्त्रक्रियागृह असणारे हे देशातील एकमेव दंत महाविद्यालय आहे. नायर दंत महाविद्यालयात ३५० पेक्षा अधिक विद्यार्थी दंत वैद्यकीय शिक्षण घेतात. विद्यार्थ्यांना ज्ञानदान करण्यासाठी ५७ प्राध्यापक आहेत. २४ तास इमर्जन्सी डेंन्टल क्लिनिक संचलित करणारे देशातील हे एकमेव दंत महाविद्यालय व रुग्णालय आहे.