Join us

महिलेच्या अवयवदानामुळे पाच वर्षांच्या चिमुरड्याला नवसंजीवनी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2018 2:43 AM

कांदिवली येथील ५१ वर्षीय महिलेच्या अवयवदानामुळे तिघांना जीवनदान मिळाले आहे. घरात चक्कर आल्याने ही महिला कोसळली.

मुंबई : कांदिवली येथील ५१ वर्षीय महिलेच्या अवयवदानामुळे तिघांना जीवनदान मिळाले आहे. घरात चक्कर आल्याने ही महिला कोसळली. अंधेरी येथील खासगी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू असताना तिला ब्रेनडेड घोषित करण्यात आले. त्यानंतर तिच्या कुटुंबाने अवयवदानाचा निर्णय घेतल्याने तीन व्यक्तींना जीवनदान मिळाले.महिलेचे मूत्रपिंड, फुप्फुसे, हृदय, डोळे आणि त्वचा हे अवयव दान करण्यात आले आहेत. यापैकी फुप्फुसे कोणालाही दान करण्यात आलेली नाहीत. या महिलेचे हृदय आणि मूत्रपिंड अंधेरीच्या रुग्णालयातील रुग्णाला दान करण्यात आले. तर, परळ येथील रुग्णालयातील ५ वर्षीय मुलाला यकृत प्रत्यारोपित करण्यात आले. दुसरे मूत्रपिंड आयएनएच अश्विनी रुग्णालयातील रुग्णाला दान करण्यात आले. लोटस आय रुग्णालयात महिलेचे डोळे पाठविण्यात आले आहेत आणि त्वचा ही त्वचा बँकेत दिली आहे.महिलेला कोणत्याही प्रकारचा आजार नव्हता. मधुमेह किंवा उच्च रक्तदाबाचेही निदान नव्हते. मात्र, त्या घरीच कोसळल्या आणि बेशुद्ध झाल्या. डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरू केले, पण काही काळाने त्यांना ब्रेनडेड घोषित केले. नंतर त्यांच्या कुटुंबाने त्यांचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार यकृत, हृदय, मूत्रपिंड, डोळे आणि त्वचा हे दान केले आहेत. कुटुंबाने घेतलेला हा निर्णय सकारात्मक असून इतरांसाठी प्रेरणादायी आहे.- डॉ. रेखा बरोट, अवयवदान समन्वयक

टॅग्स :मुंबई