Join us  

नाका कामगारांना बेरोजगार भत्ता द्यावा!

By admin | Published: January 03, 2017 10:07 PM

मुंबईसह देशाच्या प्रगतीत महत्त्वाचा वाटा असलेल्या नाका कामगारांसाठी सरकारने स्वतंत्र सेवालाल आर्थिक महामंडळ निर्माण करावे.

ऑनलाइन लोकमत मुंबई, दि. 3 - मुंबईसह देशाच्या प्रगतीत महत्त्वाचा वाटा असलेल्या नाका कामगारांसाठी सरकारने स्वतंत्र सेवालाल आर्थिक महामंडळ निर्माण करावे. त्यामार्फत काम न मिळणाऱ्या नाका कामगारांना बेरोजगार भत्ता देण्यात यावा, अशी मागणी  उचल्याकार आणि ज्येष्ठ लेखक लक्ष्मण गायकवाड यांनी केली. बंजारा नाका कामगार संघटनेने राबवलेल्या जनजागृती अभियानाच्या समारोप समारंभाप्रसंगी आझाद मैदानात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.बंजारा समाजाच्या नेत्यांना समाजाच्या विकासाचा विसर पडल्याची टीकाही गायकवाड यांनी यावेळी केली. ते म्हणाले की, समाजावरील अन्याय अत्याचाराची प्रकरणे अद्याप सुरूच आहेत. बंजारा समाजातील शेकडो कामगारांचा दरवर्षी कामादरम्यान अपघाती मृत्यू होतो. मात्र त्यांच्यासाठी आवाज उठवण्यात बंजारा समाजाचे नेते कमी पडत आहेत. मृत कामगारां्च्या कुटुंबियांना आर्थिक मदतीसाठी सर्व नेते आणि संघटनांनी एकत्रित येऊन सरकारला खडसावण्याचे आवाहन त्यांनी केले.नाका कामगारांचा समावेश दारिद्र्य रेषेखाली करून शासनाच्या सर्व योजना त्यांना लागू करण्याची मागणी बंजारा नाका कामगार संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. नरेश राठोड यांनी केली. राठोड म्हणाले की, नोंदणीअभावी कोणतेही अधिकार नसल्याने नाका कामगारांना ठेकेदार आणि कंत्राटदारांकडे गुलामासारखे काम करावे लागत आहे. त्यांना कोणत्याही सुविधांचा लाभ मिळत नाही. याउलट सेस रक्कमेच्या स्वरूपात नाका कामगारांसाठी हजारो कोटी रुपयांचा निधी सरकारी तिजोरीत पडून आहे. त्यामुळे ९० दिवसांच्या नोंदणीची जाचक अट शिथील करून अधिकाधिक कामगारांची नोंदणी सरकारने करण्याचे आवाहन राठोड यांनी केले. नाका कामगारांच्या मागण्या  - नाका कामगारांसाठी सेवालाल आर्थिक महामंडळ निर्माण करावे.- प्रत्येक नाक्यावर कामगारांसाठी आसरा शेड बांधावा.- सर्व कामगारांना भविष्य निर्वाह निधी आणि पेन्शन योजना लागू करावी.- नाका कामगारांसाठी १ रुपया प्रति महिना दराने विशेष विमा योजना सुरू करावी.- स्वस्त धान्य दुकानामार्फत नाका कामगारांना अल्प दरात खाद्यान्य पुरवावे.