पावणेअकरा लाखांच्या दागिन्यांवर नोकराचा डल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 05:45 AM2019-01-19T05:45:50+5:302019-01-19T05:45:58+5:30
मुंबई : : मालकिणीच्या पावणेअकरा लाखांच्या दागिन्यांवर नोकराने हात साफ केला आणि भावाच्या मृत्यूचे कारण देत पळ काढल्याचा प्रकार ...
मुंबई : : मालकिणीच्या पावणेअकरा लाखांच्या दागिन्यांवर नोकराने हात साफ केला आणि भावाच्या मृत्यूचे कारण देत पळ काढल्याचा प्रकार वरळीत उघडकीस आला आहे.
वरळी परिसरात तक्रारदार ५० वर्षीय महिला राहण्यास आहे. घरकामासाठी त्यांच्याकडे ३ नोकर आहेत. त्यापैकी प्रशांत दास हा गेल्या ४ महिन्यांपासून त्यांच्याकडे स्वयंपाकी म्हणून काम करायचा. यापूर्वी त्याने एक वर्ष त्यांच्याकडे काम केले होते. त्यामुळे तो त्यांच्या विश्वासातला होता. नोकरांसाठी घरासमोरील फ्लॅटमध्ये राहण्याची सोय होती. त्यामुळे तोही अन्य नोकरांसोबत तेथेच राहायचा.
३० डिसेंबर रोजी त्यांच्या नातेवाइकांचे लग्न होते. यासाठी २५ डिसेंबर रोजी त्यांनी घरातील सर्व दागिने बाहेर काढून, लग्नात कुठले दागिने घालायचे याची निवड करण्यास सुरुवात केली. दरम्यान दास त्यांच्याकडे कामानिमित्त आला होता. त्यानंतर तो निघून गेला. त्यांनी दागिने कपाटात ठेवून दिले.
दुसऱ्याच दिवशी दासने भाऊ आणि वहिनीमध्ये वाद सुरू असल्याचे मालकिणीला सांगितले. या भांडणात तो जखमी झाल्याचेही सांगितले. २७ तारखेला पहाटे रडत रडतच भावाचा मृत्यू झाल्याने गावी जावे लागणार असल्याचे सांगून तो निघून गेला. ३० तारखेला लग्नात घालण्यासाठी त्या दागिने पाहायला गेल्या. तेव्हा दागिने गायब असल्याचे दिसून आले. त्यांनी सगळीकडे शोध घेतला, मात्र दागिने सापडले नाहीत. त्यानंतर २५ ते २७ डिसेंबरदरम्यान दासनेच घरातील दागिन्यांवर हात साफ केल्याची तक्रार त्यांनी वरळी पोलिसांत केली.
दासबाबत कुठलीही माहिती तक्रारदारांकडे उपलब्ध नाही. त्यामुळे तपासात अडचणी निर्माण होत आहेत. मात्र आरोपीच्या अन्य माहितीवरून शोध सुरू असल्याचे वरळी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुखलाल वर्पे यांनी सांगितले.