नालेसफाई झाली; पण कुठे...

By admin | Published: June 4, 2017 03:10 AM2017-06-04T03:10:21+5:302017-06-04T03:10:21+5:30

मुंबई शहर आणि उपनगरातील नालेसफाई वेगाने होत असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. मात्र, विरोधकांनी नालेसफाईच्या कामावर ताशेरे ओढले असून

Nalasafai; But where ... | नालेसफाई झाली; पण कुठे...

नालेसफाई झाली; पण कुठे...

Next

- लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरातील नालेसफाई वेगाने होत असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. मात्र, विरोधकांनी नालेसफाईच्या कामावर ताशेरे ओढले असून, नालेसफाई करण्यात आली नसल्याचे म्हटले आहे. महत्त्वाचे म्हणजे, महापौरांनी नालेसफाईच्या कामाचा पाहणी दौरा करत नालेसफाईची कामे वेगाने करण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या आहेत. प्रत्यक्षात मात्र, मुंबई शहरासह उपनगरातील नाल्यांची अवस्था सफाईविना वाईट असून, महापालिकेच्या पावसाळीपूर्व कामांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मुलुंड क्षेपणभूमी व पूर्व उपनगरातील नालेसफाई कामांची महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी सभागृह नेते यशवंत जाधव व स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर यांच्यासमवेत पाहणी करून आढावा घेतला.
मुलुंंड क्षेपणभूमीची पाहणी केल्यानंतर महापौरांनी कचऱ्यापासून वीजनिर्मिती, तसेच मिथेन गॅस व कचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प भविष्यात या ठिकाणी महापालिकेतर्फे राबविण्यात येणार आहे का, याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली.
पर्यावरणदृष्ट्या योग्य त्या पद्धतीने खबरदारी घेण्याबाबत त्यांनी संबधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले. त्याचप्रमाणे, भविष्यकाळात कशा पद्धतीने हा प्रकल्प हाताळण्यात येणार आहे, याची सविस्तर माहिती सादर करण्याची सूचना त्यांनी संबधित अधिकाऱ्यांना केली.
मुलुंड (पूर्व)च्या बाऊंडी नाला, केसरबाग नाला, तसेच नानेपाडा नाल्याची पाहणी महापौरांनी केली. नाल्यामधील तरंगता कचरा वेळोवेळी काढणे, तसेच काढण्यात आलेला गाळ उचलणे व नाल्याकाठचा परिसर स्वच्छ ठेवण्याची सूचना केली. त्याचप्रमाणे, नानेपाडा नाल्याचे रेल्वे हद्दीतील रुंदीकरणाचे काम ताबडतोब मार्गी लावण्याबाबत रेल्वेकडे पाठपुरावा करण्याची सूचना त्यांनी केली.
एस विभागातील बॉम्बे आॅक्सिजन नाला, उषानगर नाला, क्रॉम्प्टन कांजूर नाल्याची पाहणीही महापौरांनी केली.
एन विभागातील लक्ष्मीबाग नाला, सोमय्या नाला (सार्वजनिक बांधकाम विभागाचे मैदान)ची पाहणी केली. लक्ष्मीबाग नाल्याकाठी राहणाऱ्या नागरिकांना पावसाळ्यात कोणत्याही प्रकारे धोका निर्माण होऊ नये, तसेच त्यांचे या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करण्याची कार्यवाही ताबडतोब करण्याची सूचना महापौरांनी केली.
एम/पूर्व विभागातील मानखुर्द नाला, देवनार नाला आणिक बस डेपोसमोरील माहूल क्रिक नाल्याची पाहणी महापौरांनी केली.

पावसाळ््यात जनजीवन ठप्प होऊ नये, म्हणून खबरदारी
- मुंबई शहर व उपनगरातील नालेसफाईचे पावसाळ्यापूर्वी करावयाचे काम जवळपास पूर्णत्वाच्या मार्गावर असून, रस्त्यांच्या कामांसाठी पावसाळ्यापूर्वी निर्धारित केलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले आहे, असा दावा पालिकेने केला आहे.
- पावसामुळे मुंबईचे जनजीवन ठप्प पडू नये, यासाठी पाचही पंपिंग स्टेशनमधील पाणीउपसा करणाऱ्या पंपांची तपासणी करण्यात आली असून, ते पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होईल, याची खबरदारी घेण्यात आली आहे.
- रस्त्यांवर अतिवृष्टीमुळे खड्डे पडू नयेत, म्हणून फक्त खड्डे न भरता, संपूर्ण पॅच भरून घेण्यात आले आहेत.
- मोठे नाले, छोटे नाले यांचाही गाळ काढण्याची कामेही ९५ टक्के पेक्षा जास्त झाली आहेत, तसेच अतिवृष्टीतही पाणी जास्त वेळ थांबणार नाही, याचीही दक्षता घेण्यात आली आहे.
- नाल्याकाठी राहणाऱ्या नागरिकांनी नाल्यात कचरा न टाकता, कचरा संकलन केंद्रावर कचरा टाकावा, याबाबत जनजागृती करावी, अशी सूचना आज महापौरांनी केली.

Web Title: Nalasafai; But where ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.