Join us

नालेसफाईवरून सेना-भाजपात चिखलफेक

By admin | Published: May 16, 2017 1:13 AM

स्वबळावर मुंबई महापालिकेवर भगवा फडकाविणाऱ्या शिवसेना आणि भाजपा पाहरेकऱ्यांच्या भूमिकेत शिरल्यामुळे उभय पक्षांमध्ये जोरदार चिखलफेक सुरू आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : स्वबळावर मुंबई महापालिकेवर भगवा फडकाविणाऱ्या शिवसेना आणि भाजपा पाहरेकऱ्यांच्या भूमिकेत शिरल्यामुळे उभय पक्षांमध्ये जोरदार चिखलफेक सुरू आहे. या वेळी निमित्त ठरले आहे ते पावसाळ्यापूर्वीच्या नालेसफाईच्या कामाचे. या कारणावरून दोन्ही पक्ष आपापसात भिडले असून त्यांच्यात ‘महाभारत’ रंगू लागले आहे. सेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी नालेसफाईचा पाहणी दौरा केला होता. त्या वेळी नाल्यांची शंभर टक्के सफाई शक्य नाही, असे विधान केले होते. त्याचा भाजपाने समाचार घेतला होता. सेनेचा पाहणी दौरा हा भ्रष्ट ठेकेदारांना क्लीन चिट देण्यासाठीच होता, असा आरोप भाजपाचे मुंबई अध्यक्ष अ‍ॅड. आशिष शेलार यांनी केला. त्यामुळे खवळलेल्या शिवसेनेने शेलार यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. सोमवारी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी शेलार यांना टोला लगावताना भाजपाची अवस्था ‘बालिश बहु बायकांत बडबडला’, अशी झाली असल्याचा टीका केली. त्याला भाजपानेही प्रत्युत्तर दिले आहे. ‘करुन दाखवले’ असे बोलणारे आता शंभर टक्के गाळ साफ होणार नसल्याचे सांगतात. त्यावरुन महापौरांनी महाभारतातील कोणत्या पात्राशी स्वत:ची तुलना करावी हे ठरवावे, असा टोमणा गटनेते मनोज कोटक यांनी मारला आहे. शिवसेनेचे प्रत्युत्तरनालेसफाईनंतर गाळ उचलण्यासाठी अटी शिथील करण्याच्या निर्णयावरुन भाजपाने शिवसेनेवर तोफ डागली आहे. त्याला महापौरांनी आज प्रत्युत्तर दिले. स्थायी समितीत गाळ उचलण्याचा प्रस्ताव मंजूर झाला तेव्हा मुंबईच्या पहारेक-यांनी का विरोध केला नाही, असा उलट सवाल महापौरांनी केला. नालेसफाईची जबाबदारी ही सहाय्यक आयुक्तांची असते, असे त्यांनी निदर्शनास आणले. महाभारतातील ‘उत्तरा’ या पात्राची आठवण करून देत ‘बालिश बहु बायकात बडबडला, अशी परिस्थिती असल्याचा चिमटा त्यांंनी भाजपाचे नाव न घेता काढला.१निविदा प्रक्रियेला प्रतिसाद मिळत नसल्याने गाळ उचलण्याच्या कंत्राटातील काही अटी शिथील करण्यात आल्या असल्याचे सांगत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी महापालिकेच्या निर्णयाची पाठराखण केली. २लहान नाल्यातील गाळ उचलण्यासाठी ठेकेदार नेमताना महा पालिकेने वाहनांवर व्हेईकल ट्रेकिंग यंत्र बसविण्याच्या अटी बरोबरच अनेक अटी रद्द केल्या. या निर्णयाने विरोधकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ३महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांची भेट घेण्यासाठी आलेल्या युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना पालिकेच्या निर्णयाचे समर्थन केले. सहा वेळा निविदा मागवूनही ठेकेदार मिळत नसल्याने काही अटी शिथील करण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले.